Pune : निंबाळकर तालीम मंडळातर्फे संस्थांना धान्याचे वाटप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पौराहित्य करणाऱ्या गुरुजींचा श्री सदगुरु ग्रुप तसेच शिर्डी साईबाबा अंध महिला वृध्दाश्रम आणि लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्था या तीन संस्थांना निंबाळकर तालीम गणेशोत्सव मंडळातर्फे धान्याचे वाटप करण्यात आले.

दोन्ही अंध संस्थामध्ये जाऊन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी धान्य दिले. श्री सदगुरु ग्रुप संस्थेचे श्री. घाटे गुरुजी यांच्याकडे रविवारी धान्य सुपूर्द करण्यात आले. हा कार्यक्रम मंडळाच्या गणपती मंदिरात झाला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुरेशराव पवार, उपाध्यक्ष गणेश बुचडे पाटील, खजिनदार अशोक कोंढाळकर, सरचिटणीस विशाल गायकवाड, गणेशोत्सवाचे अभ्यासक आनंद सराफ आदी उपस्थित होते.

सध्या कोरोना साथीच्या काळात विविध घटकांचे उत्पन्न घटल्याने बिकट स्थिती निर्माण झाली आहे. अशा प्रसंगी गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी मंडळाने हा उपक्रम हाती घेतला, असे अध्यक्ष सुरेशराव पवार यांनी सांगितले. संकटकाळात मदतीसाठी धावून जाणे हीच गणेशोत्सव मंडळांची ओळख आहे. या परंपरेला साजेसे काम निंबाळकर तालीम मंडळाने केले, असे आनंद सराफ यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले.

मंडळाच्यावतीने प्रत्येक संस्थेला २५ किलो तांदुळ, ५ किलो गहू, ५ किलो पोहे, ५ किलो रवा, ५ किलो तूरडाळ, ५ किलो बटाटे आणि ५ लिटर गोडे तेल देण्यात आले.