Pune : ‘यापुढे मिलीजुली सरकार नहीं चलेगी’ ! DCP पंकज देशमुख यांनी वाघोलीतील बैठकीत दिला सज्जड दम

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाईन- पुणे ग्रामीण पोलीस दलातील लोणीकंद पोलीस स्टेशनआता पुणे शहर पोलीस आयुक्तालयात समावेश झाल्याने पुणे शहरासारखा क्विक रिस्पॉस याठिकाणी मिळणार आहे.तर तक्रारदारावर दबाव आणणे, धमकी देणे,नागरिकांवर दबाव आणणे,खंडणीची मागणी करणे, वेठीस धरणे, मारण्याची भीती दाखविणे असे प्रकार पुणे शहर पोलीस यापुढे खपवून घेणार नाहीत.अशा प्रकारचे हितसंबंध, गुंडगिरी, दादागिरी मुळासकट उखडून टाकली जाइल, तर यापुढे मिलीजुली सरकार चालणार नाही असा सज्जड दम वजा इशाराच शहर पोलीस दलातील झोन ४ चे डीसीपी (उपायुक्त) पंकज देशमुख यांनी वाघोलीतील बैठकीत दिला आहे. लोणीकंद पोलीस ठाण्याचा पुणे शहर पोलीस दलात समावेश झाल्यानंतर येथील लोकप्रतिनिधी व नागरिकांशी संवाद साधण्यासाठी वाघोली येथे बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी नागरिकांनी लोणीकंद पोलीस ठाण्याला ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असल्याने शहर पोलिसांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी अशी मागणी केल्यानंतर उत्तर देताना देशमुख बोलत होते.

यावेळी शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार, येरवडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, वाघोलीचा सरपंच वसुंधरा उबाळे, रामभाऊ दाभाडे, राजेंद्र सातव ,दादासाहेब सातव, लोचन शिवले, दीपक गावडे, डॉ. चंद्रकांत कोलते, बाळासाहेब सातव, शांताराम कटके यांच्या सह परिसरातील लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी वाघोलीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करावी, पोलिसांना राहण्यासाठी वसाहत करावी, कडक वाहतूक नियमावली राबवावी, पैशासाठी नागरिकांची अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई करावी, पोलीस चौक्या कराव्यात, वाघोली पोलीस स्टेशन स्वतंत्र करावे, भाड्याने राहणाऱ्या नागरिकांची माहिती घ्यावी अशा काही सूचना केल्या. यावेळी बोलताना शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रयत्नातून लोणीकंद पोलिस स्टेशन पुणे शहर पोलीस दलात समावेश झाला आहे. तर आज पुणे शहर पोलिस नागरिकांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी आले आहे. तळागाळातील नागरिकांचे प्रश्न ऐकल्या शिवाय कोणताच मार्ग निघत नाही . त्यामुळे या बैठकीतून नक्कीच चांगला मार्ग निघेल आणि चांगली पोलिसिंग आपल्याला अनुभवास मिळेल.

यावेळी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देताना पंकज देशमुख म्हणाले कि, पुणे शहराप्रमाणे लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसिंग राबविली जाईल. नागरिकांच्या सोयीसाठी पोलीस २४ तास हजार असतील. लोणीकंद पोलीस ठाण्यास २ गाड्या, बीट मार्शलसाठी ३ दुचाकी देण्यात आल्या आहेत. वाहतूक कोंडी नियंत्रणासाठी अधिकारी व १० कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र युनिट कार्यरत होणार आहे. पोलीस ठाण्यास अधिकचे ४ अधिकारी व १५ पोलीस कर्मचारी देण्यात आले आहेत. जवळपास १०० कर्मचारी दिले जातील. ग्रामीण भागामध्ये आवश्यक ठिकाणी ४ ते ५ पोलीस चौक्या उभारण्यात येतील. पेट्रोलिंगचे प्रमाण वाढणार आहे. लोणीकंद मधून स्वतंत्र वाघोली पोलीस ठाण्याची निर्मिती झाल्यानंतर याठिकाणी देखील अशाच सुविधा देण्यात येईल. तर तर माणसाने कमी बोलावे व आपल्या कामातून दाखवून द्यावे यानुसार वागणारा मी आहे त्यामुळे नक्कीच आपल्याला पुढील काही दिवसात चांगली पोलिसिंग अनुभवयास मिळेल असे देखील देशमुख यांनी सांगितले.