Pune : लसीकरण केंद्रावर नगरसेवकांची लुडबुड नको- मराठा टायगर फोर्सचे संस्थापक अध्यक्ष संदीप लहाने पाटील

पुणे : पुणेकरांना लस देण्याचे काम पुणे महानगरपालिका करत आहे. पुणे महानगरपालिकेच्या यंत्रणेकडून लसीकरणाची मोहीम जोरात सुरू आहे. मात्र प्रत्येक लसीकरण केंद्रावर नगरसेवकांकडून हस्तक्षेप केला जात आहे. नगरसेवकांच्या दबावामुळे त्यांच्या जवळच्या लोकांना लसीकरण केले जाते. इतर नागरिकांना वेळेत लसीकरण होत नाही. तसेच सर्व यंत्रणा महानगरपालिकेची आहे, त्यामुळे लसीकरण केंद्रावर नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ताबडतोब लुडबूड थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा मराठा टायगर फोर्सचे संस्थापक अध्यक्ष संदीप लहाने पाटील यांनी दिला आहे.

लहाने पाटील म्हणाले की, नगरसेवकांचे कार्यकर्ते लसीकरण केंद्रावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दबाव टाकतात. त्याच पद्धतीने नगरसेवकांच्या संगनमताने प्रत्येक ठिकाणी लसीकरण केंद्रावर गैरप्रकार सुरू आहे. पुणे महानगर पालिकेने विशेष लक्ष घालून असे गैरप्रकार तातडीने थांबवले पाहिजेत, ही बाब अत्यंत गंभीर आहे. कोरोनाचा ज्वर वाढत आहे, नागरिक सैरभैर झाले आहेत. त्यामुळे कोरोनाची लस घेण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. मात्र, लसीकरण केंद्रावर लस घेणाऱ्यांऐवजी नगरसेवकांसह पक्षीय कार्यकर्त्यांची लूडबूड वाढली आहे. त्यामुळे लस घेणाऱ्यांचा गोंधळ उडत आहे. त्याचबरोबर गर्दी वाढत असल्याने कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने कडक निर्बंध केले आहेत. सकाळी 7 ते 11 दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू ठेवली आहे. हडपसर गाडीतळ, मुंढवा, केशवनगर, मगरपट्टा, गोंधळेनगर, मांजरी, वानवडी आदी ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून लसीकरण सुरू केले आहे. ज्येष्ठ नागरिक लस घेण्यासाठी येत आहेत. मात्र, आधार कार्ड न घेताच लस दिली गेल्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, तातडीने त्या व्यक्तीचा शोध घेऊन आधार कार्ड क्रमांक घेण्यात आला. त्यामुळे लसीकरण केंद्रावर लस घेणाऱ्या व्यक्तीशिवाय इतर पक्षीय कार्यकर्त्यांनी लूडबूड करू नये, असा सबुरीचा सल्ला ज्येष्ठ नागरिकांनी दिला. मदत करायची असेल तर ज्येष्ठ नागरिकांना घरापासून लसीकरण केंद्रापर्यंत न्या आणि बाहेर थांबा, ही पद्धत कार्यकर्त्यांसाठी योग्य आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही, असे सय्यदनगरमधील विक्रम आल्हाट यांनी सांगितले.

शहर-उपनगराबरोबर लगतच्या गावातील खासगी रुग्णालयामध्येसुद्धा बेड मिळत नाहीत, ऑक्सिजन नाही, व्हेंटिलेटर बेड नाहीत, अशी भयावह अवस्था आहे. काल (मंगळवार, दि. 20 एप्रिल) शेवाळेवाडी येथील खासगी रुग्णालयामध्ये ऑक्सिजन संपल्याने रुग्णांचा मृत्यू झाला, हीच परिस्थिती चाकणमध्येही झाली. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे. मात्र, रोजंदारीवरील मजूर आणि परप्रांतीयांची घरवापसी घाई, तर दुसरीकडे संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. गोंधळाची परिस्थिती कमी म्हणून की, काय रेमडिसिव्हरचा काळाबाजार, बनावट रेमडिसिव्ह औषधे, लसीकरणाचा बिघडलेला ताळेबंद आणि हॉस्पिटलमध्ये हवा तो बेड मिळविण्याची हातघाई यामुळे सर्वच परिस्थिती हाताबाहेर जाते की काय, अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. आजपर्यंत प्रशासनाकडे पुण्यातील कोविड-19 उपचार देणाऱ्या हॉस्पिटलची अद्ययावत माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्रत्यक्ष उपलब्ध बेडपेक्षा कमी बेड प्रशासनाच्या आकडेवारीत दिसत होते. अनेक हॉस्पिटलकडून कोविडवर उपचार करत आहेत, मात्र त्यांची प्रशासनाकडे नोंदणी नाही. त्यामुळे अधिकृत नोंदणी न झाल्यामुळे कोविडवर उपचार करणाऱ्यांची संख्या कमी दिसत आहे. आता प्रशासनाने प्रत्येक हॉस्पिटलची अद्ययावत माहिती संकलित करणे अत्यंत गरजेचे आहे. क्षमता असलेल्या तुलनेने लहान मोठ्या हॉस्पिटलला तशी परवानगी तातडीने देणे गरजेचे आहे.

ससाणेनगरमधील ससाणेनगर नागरी कृती समितीचे अध्य़क्ष मुकेश वाडकर म्हणाले की, कोरोना हे मानव जातीवर आलेले मोठे संकट आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षाने त्याचे राजकारण करायला नको. राजकारण्यांनी एकमेकांची उणीदुणी न काढता सामुहिक प्रयत्नातूनतच लोकांचे जीव वाचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, त्यामुळे प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आता लसीकरण सुरू आहे. मात्र, लसीकरण केंद्रावर लस घेणाऱ्यापेक्षा इतरांचीच गर्दी वाढलेली दिसत आहे. सर्वच लसीकरण केंद्रावरील अनावश्यक गर्दी हटविण्याची गरज आहे. लसीकरणाचे काम सुरळीत होण्यासाठी प्रत्येकाने सहकार्याची भावना ठेवली पाहिजे, हे होताना दिसत नाही. पक्षीय मंडळी श्रेयवादासाठी पुढे पुढे करताना दिसत आहेत. आता राजकारण करण्याची वेळ नाही, याचे प्रत्येकाने भान ठेवले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.