Lockdown : पुणे अन् पिंपरी-चिंचवडमध्ये लॉकडाऊनची अंमलबजावणी आणखी कडक करणार : जिल्हाधिकारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील कोरोनाचा वाढता रुग्णदर कमी करण्यासाठी तसेच रुग्णांवर वेळेत व योग्य प्रकारे उपचार होवून मृत्युदर कमी करण्यासाठी नियोजन करण्याच्या दृष्टीने आज जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली महसूल व आरोग्य विभागाची नियोजन बैठक घेण्यात आली.

बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, ससून हॉस्पिटल चे समन्वयक राजेंद्र गोळे तसेच महसूल विभाग, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवा-सुविधांबाबत जिल्हाधिकारी श्री. राम यांनी आढावा घेतला. तसेच या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका यांच्यासाठी आवश्यक असणारे पीपीई किट, एन ९५ मास्क, सर्जिकल मास्क, हॅन्ड ग्लोव्हज, औषध साठा, बरे झालेल्या रुग्णांना घरापर्यंत पोहोचवण्यासाठी उपलब्ध शासकीय व खाजगी रुग्णालयांच्या ऍम्ब्युलन्स ची उपलब्धता व आवश्यकता, मृतदेहाबाबत घ्यावयाची दक्षता आदी विषयांबाबत तसेच लॉक डाऊन काळात जिल्ह्यात अडकलेल्या प्रवासी व कामगारांसाठीचे निवारा कॅम्प व भोजन व्यवस्था, रेशन धान्य वितरण यांचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत पुण्यातील कोविड-१९ रुग्णदर व मृत्युदर कमी व्हायला हवा. आठ दिवस पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात तसेच रुग्ण आढळलेल्या ग्रामीण भागात टाळेबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. यात नागरिकांचे सहकार्य हवे आहे. या काळात नागरिकांनी घरी राहणे आवश्यक असून अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी सोशल डिस्टनसिंग चे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. अत्यावश्यक सेवेत कार्यरत व्यक्तींना पासेस द्यावेत, तसेच या कामातील वाहनांना इंधन पुरवठा होत असल्याची खात्री करावी. त्याचबरोबर शैक्षणिक संस्था मधील प्राचार्यांना पासेस देण्याची व्यवस्था करावी.

स्वॅब चाचणी निगेटिव्ह असणाऱ्या व्यक्तींना घरी पोहोचण्यासाठी पीएमपीएमएल च्या बसेस वापरता येतील, असे सांगून बस चालकांना मास्क देण्याबरोबरच वेळोवेळी बसचे निर्जंतुकीकरण करुन घ्यावे, अशा सूचना राम यांनी दिल्या.

ससून हॉस्पिटल, नायडू हॉस्पिटल, यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलला आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय सुविधा तसेच नवले, भारती, सिंबायोसिस आदी खाजगी हॉस्पिटल मध्ये उपलब्ध असलेले पीपीई किट व स्वच्छता विषयक सामग्री चा जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी आढावा घेतला.