Pune : सदाशिव पेठेतील कुंटे चौकातील ज्येष्ठास धमकावत घेतला दुकानाचा ताबा, 1 कोटी 80 लाखांची फसवणूक, तिघांना अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – जेष्ठ नागरिकास धमकावत सदाशिव पेठेतील कुंटे चौकात असणाऱ्या एका दुकानाचा जबरदस्तीने ताबा घेऊन 1 कोटी 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. स्वारगेट पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

याप्रकरणी गणेश बाबुराव यादव (रा. पर्वतीगाव), श्रीकांत वसंतराव तेरभाई (रा. कोथरुड) आणि परेश अनिलकुमार भंडारी (रा. कोंढवा बुद्रुक) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत महर्षीनगर येथील 32 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी मेसर्स कला या दुकानाच्या हिस्याचे कुलमुखत्यारपत्र त्यांच्या वडिलांचे नावे केले होते. वडिलांना काही आजार होता. हा प्रकार आरोपींना माहीत होता. त्याचा फायदा घेत त्यांनी फिर्यादी यांच्या वडिलांना धमकावत कुटुंबातील व्यक्तींना बरे वाईट करण्याची धमकी दिली. तसेच वडील व चूलत्याना गाडीत बसवून हवेली दुय्यम निबंधक कार्यालयात नेले. त्याठिकाणी गणेश यादव याला दुकानाच्या प्रॉपर्टीचा मॅनेजर म्हणून नेमले असल्याबाबत कुलमुखपत्रावर सह्या घेतल्या. तसेच सदाशिव पेठेतील लक्ष्मी रस्त्यावर असणाऱ्या 1 कोटी 30 लाख रुपयांच्या दुकानाचा ताबा घेतला. त्यानंतर त्या दुकानातील 30 लाखांचे महागडे फर्निचर एका व्यक्तीला दिले. तसेच त्यांची महत्वाची कागदपत्रे दिली. त्यानंतर हे दुकान दुसऱ्याला देण्याचा काही एक अधिकार नसताना त्यांनी हे दुकान परेश भंडारी याला देऊन फिर्यादी यांची एकूण 1 कोटी 80 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी तिघांना अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 6 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास महिला सहाय्यक निरीक्षक शेख या करत आहेत.