खंडणीसाठी व्यावसायिकावर गोळीबार प्रकरणात एकजण ताब्यात

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – खडकवासला भागात खंडणासाठी व्यावसायिकावर गोळीबार प्रकरणात एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. रविवारी रात्री खडकवासला परिसरात ही घटना घडली असून यात व्यावसायिकाचा मित्र जखमी झाला आहे.

उदय उर्फ विक्या महेंद्र सोनवणे (वय २०, रा. किरकटवाडी) असे पकडलेल्याचे नाव आहे. तर त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. गोळीबारात विजय उर्फ खंडू लक्ष्मण चव्हाण (वय २५, रा. रायकर मळा, धायरी) जखमी झाले आहेत. याप्रकरणी राजू सोनवणे यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

राजू सोनवणे यांचा इलेक्ट्रिक साहित्यनिर्मितीचा व्यवसाय आहे. ते राहण्यास खडकवासला येथील लांडगे वस्तीत आहेत. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मित्र विजय यांच्यासोबत बोलत थांबले होते. त्यावेळी घरानजीक असलेल्या चेतन लिमण उर्फ मामा याच्यासह ४ ते ५ हल्लेखोरांनी ५० हजारांची खंडणी न दिल्यामुळे राजूवर गोळीबार केला. गोळीबारात राजूऐवजी त्यांचा मित्र विजय गंभीर जखमी झाला. त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी तातडीने पथक तयार करुन हल्लेखोरांचा माग काढण्यास सुरुवात केली. हल्लेखोर उदय नांदेड फाटा येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने इतर साथीदारांच्या मदतीने गोळीबार केल्याची कबुली दिली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट, रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे, दत्तात्रय जगताप, विजय कांचन, दत्तात्रय तांबे, गुरु जाधव, अमोल शेंडगे, एम. एस. भगत, धीरज जाधव यांच्या पथकाने केली.