मोबाइलसह रोकड चोरणाऱ्याला अटक, दत्तवाडी पोलिसांची कामगिरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पर्वती टेकडीवर फिरण्यास गेलेल्या नागरिकाला अडवून चाकुचा वार करुन सात हजारांच्या मोबाईलसह २०० रुपयांची रोकड चोरणाऱ्यास दत्तवाडी पोलिसांनी पकडले.

याप्रकरणी मनोज बहुतुजे (वय ३५, रा. जनता वसाहत, पर्वती) यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पर्वती टेकडीवरील कार्तिक स्वामी मंदीराकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज एका कापड दुकानात कामाला असून दोन दिवसांपूर्वी ते फिरण्यासाठी पर्वती टेकडीवर गेले होते. रस्त्याच्या बाजूला असलेल्या भिंतीवर मनोज बसलेले असताना पाठीमागून आलेल्या चोरट्याने मनोजवर चाकूचा वार करून तीन दात पाडले. त्यानंतर चोरट्याने मनोजच्या खिशातील ७ हजारांचा मोबाईल आणि २०० रुपयांची रोकड चोरुन नेली. चोरट्याला पोलिसांनी सिंहगड रस्त्यावरील विघ्नहर्ता पार्किंगमधून ताब्यात घेतले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक के. डी. संकपाळ, सोमेश्वर यादव, बजरंग पवार, शरद राऊत, शिवाजी क्षीरसागर, सागर सुतकर, अमित सुर्वे, विकास कदम, नवनाथ भोसले, अक्षयकुमार वाबळे, अभिजित कळसकर, राहुल ओलेकर यांच्या पथकाने केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/