पुणे : डंपरच्या धडेकत दुचाकीस्वारील तरुणाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मालाची डिलव्हरीकरून परत निघालेल्या दोन मित्रांच्या दुचाकीला भरधाव डंपरने धडक देऊन झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. तर, एक तरूण जखमी झाला आहे. नवले ब्रिजजवळील मनपसंद बिर्याणी हॉटेलसमोर ही घटना घडली आहे. विराज प्रताप निकम (वय 29, रा. धनकवडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, प्रितेश शहा (वय 29, रा. धनकवडी) हा याघटनेत गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (एम.एच.12.एच.बी. 1555) डंपरवरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रितेश शहा व त्याचा मित्र एका डिलव्हरी कंपनीत नोकरी करत होते. दरम्यान, एका वस्तूची डिलव्हरी देण्यासाठी ते सिंहगड रोड परिसरात आले होते. मालाची डिलव्हरी देऊन ते दोघे परत येत होते. यावेळी प्रितेश त्याची मोपेड दुचाकी चालवत होता. तर, विराज हा त्याच्या पाठिमागे बसला होता.

दरम्यान, येथील सर्व्हिस रोडने नवले ब्रिज चौकाकडे येत असताना मनपसंद बिर्याणी हाटेलसमोर आल्यानंतर पाठिमागून आलेल्या डंपरने त्यांना जोरात धडक दिली. यात दोघेही खाली कोसळून गंभीर जखमी झाले. विराज याच्या पोटाला गंभीर मार लागल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, प्रितेश याला अपघातात उजवा, बरगडी व पाठिला गंभीर मार लागला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.