Lockdown : कात्रज भागात रिक्षा उलटून प्रवाशाचा मृत्यू; तर रिक्षा चालक जखमी

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असून, या संचारबंदीत देखील एक भरधाव रिक्षा उलटून झालेल्या अपघातात प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. कात्रज भागात ही घटना घडली आहे. तर रिक्षाचालक जखमी झाला आहे.

श्रीनिवास व्यंकटेश आडेप (वय ५२,रा.नाना पेठ) असे मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशाचे नाव आहे. रिक्षाचालक युवराज श्रीहरी वाघमारे (वय ४५, मांगडेवाडी,कात्रज) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आडेप शासकीय कर्मचारी आहेत. पाच ते सहा महिन्यांपूर्वी ते मांगडेवाडी भागात वास्तव्यास आले आहेत. आठवड्यापूर्वी ते रिक्षातून कात्रज भागातून जात होते. त्यावेळी स्वागत हॉटेलजवळ तीव्र उतारावर रिक्षा उलटली. या अपघातात आडेप यांना गंभीर दुखापत झाली होती. तर रिक्षाचालक वाघमारे जखमी झाले होते. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान आडेप यांचा मृत्यू झाला. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

प्रवाशाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरुन रिक्षाचालक वाघमारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.सहाय्यक फौजदार मोहन देशमुख तपास करत आहेत.