खोट्या बातम्या देऊन खंडणी उकळल्या प्रकरणी पत्रकार देवेंद्र जैन यांच्यासह दोघांवर FIR, एकाला अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन खोट्या बातम्या देऊन जमीन व्यवहारात धमकावत खंडणी उकळल्याप्रकरणी पत्रकार देवेंद्र जैन यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2015 ते 2019 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी मोहन राजू बहिरट (वय 26, रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पत्रकार देवेंद्र जैन आणि सद्दाम उर्फ दत्तात्रय उर्फ बाळासाहेब गुलाबराव कामठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कामठे याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आजोबांनी शेवळवाडी येथील जमीन विक्रीसाठी काढली होती. यावेळी एकाने ही जमीन खरेदी केली होती. परंतु, सद्दाम उर्फ दत्तात्रय उर्फ बाळासाहेब याने खरेदीदार यांना हा व्यवहार माझ्या मार्फतीने करायचा अन्यथा व्यवहार होऊ देणार नाही, असे धमकावले. तसेच भीती दाखवल्याने फिर्यादी यांनी 2 लाख 70 हजार रुपये दिले. त्यानंतरही 7/12 हरकतीचा अर्ज करुन खरेदीदार व फिर्यादी यांना 25 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यात 5 लाख रुपये चेकद्वारे घेतले. तसेच हरकतीचा अर्ज मागे घेण्यासाठी 1 कोटींची मागणी करत आणखी 15 लाख रुपये घेऊन त्यांना खडणी मागितली.

तसेच आरोपीने पत्रकार देवेंद्र जैन यांच्यासोबत संगनमतकरून गेल्या वर्षी जून महिन्यात जमिनीबाबत अवैध उत्खनन पाण्याचा नैसर्गिक प्रवाहास अडथळा अश्या खोट्या बातम्या देऊन बदनामी केली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. तर फिर्यादी हे मिळकत जमिनीवर गेले असता त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सद्दाम उर्फ दत्तात्रय उर्फ बाळासाहेब याला अटक केली आहे. त्याचे यापूर्वीचे रेकॉर्ड नसल्याचे सांगण्यात आले आहे. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.