Pune : कांदा महागला. पुण्यात टंचाई

पुणे – गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमालाला फटका बसला असून त्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. पुणे जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथील अनेक पिके वाहून गेली, काही पाण्याखाली आहेत. पावसाचा जोर कमी झाला असला तरी शेतकरी अजून सावरलेले नाहीत. भाजीपाल्याचे खूप नुकसान झाल्याने उपलब्ध असलेला माल बाजारपेठांमध्ये येत आहे. परिणामी, पुण्याच्या बाजारपेठेत भाजीपाला आवक थंडावली आहे. कांद्याचे दर वाढले असून ते प्रतवारीनुसार ५० ते ७० किलो असे आहेत.

व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील लासलगांव, तसेच दक्षिणेतील राज्यांमधून कांदा पुण्यात येतो. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेच शिवाय उपलब्ध माल नेण्या – आणण्यासाठीची वाहतूक अडथळ्यांमुळे मंदावली, बाजारपेठेत चांगल्या प्रतीचा कांदा कमी प्रमाणात आलेला आहे. रेस्टॉरंट्स, हॉटेल्स खुली झाली आहेत त्यामुळे कांद्याची मागणी वाढली. पण, मागणीच्या प्रमाणे पुरवठा करणे अशक्य झाले आहे. नजीकच्या काळात कांद्याचे दर खाली येण्याची शक्यता नाही असे जाणकार व्यापाऱ्यांनी सांगितले.