पुणे : ऑनलाइन साडी घेणे महिलेला पडले 20 हजाराला

पुणे पोलीसनामा ऑनलाईन – ऑनलाइन मागविलेली साडी घराचा पत्ता न सापडल्याने परत गेल्यानंतर सायबर चोरट्यांनी महिलेला पैसे रिफंड देण्याच्या बहाण्याने 20 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या एका खासगी कंपनीत नोकरीस आहेत. 2 ऑक्टोबर 2018 मध्ये त्यांनी क्लब फैक्ट्री शॉपिंग साइट साईटवरुन 710 रुपयांची साडी खरेदी केली. मात्र, घराचा पत्ता पुर्ण नसल्याने साडीचे आलेले पार्सल माघारी गेले. त्यामुळे महिलेने साडीचे पैसे परत मिळविण्यासाठी गुगगलवरुन क्लब फैक्ट्री शॉपिंग साइटच्या ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधला.

त्यावेळी संबंधिताने सुरज सिंग नाव सांगितले. तसेच, बँक खात्यावर पैसे रिफंड करण्याची बतावणी केली. त्यासाठी सूरजसिंगने महिलेला एक लिंक व्हॉट्सअपवर पाठविली. तसेच, ती उघडून पाहण्यास सांगितली. रक्कम परत मिळविण्यासाठी महिलेने लिंक उघडली असता, त्यांच्या बँकखात्यातून टप्प्याटप्प्याने 20 हजार 200 रुपये कमी झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील ताकवले हे करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –