Pune : पोलीस हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडची सोय ! कोविड सेल पुन्हा कार्यन्वित; बाधित पोलिसांसाठी हॉस्पिटलमध्ये राखीव बेड

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा फटका शहर पोलीस दलाला बसला असून शहरातील २७२ पोलीस अधिकारी व कर्मचारी सध्या उपचार करण्यात येत आहे. आजाराचा हा संसर्ग लक्षात घेऊन शहर पोलीस दलाने कोविड सेलची नियुक्ती केली आहे. या सेलमध्ये सहायक पोलीस आयुक्त, एक निरीक्षक व ३ उपनिरीक्षक व अंमलदारांची नियुक्ती केली आहे. या सेल मार्फत पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबियांशी वेळोवेळी संपर्क साधून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली जात आहे.

शिवाजीनगर येथील पोलीस हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याठिकाणी १० ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध आहेत. तसेच आणखी ऑक्सिजन सिलेंडर अ‍ॅमेझॉन कंपनीकडूनही घेण्यात येत आहे. बाधित अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबिय सर्वप्रथम शिवाजीनगर हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केले जाणार असून त्यानंतर त्यांच्यावर आवश्यकतेनुसार सिंबायोसिस लवळे, जम्बो कोविड सेंटर, कमांड हॉस्पिटल येथे उपचार केले जाणार आहेत. पहिल्या कोविड लाटेच्यावेळी या हॉस्पिटलमध्ये पोलिसांसाठी काही बेड राखीव ठेवण्यात आले होते.

ज्या पोलिसांची घरे छोटी असून कुटुंबातील सदस्यांची संख्या जास्त आहे व ते बाधित आहेत, अशांसाठी होम आयसोलेशयनची सुविधा वेगळ्या ठिकाणी करण्यात आली आहे.

शहर पोलीस दलातील १९८० जणांची अँटीजेन तपासणी करण्यात आली असून त्यात ५२ जण बाधित आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर वेळेत उपचार करणे शक्य झाले. तसेच पोलीस दलातील ४५ वर्षापेक्षा अधिक वय असणारे १९८१ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

या लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर कर्तव्य पार पाडत असलेल्या पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस ठाणे स्तरावर मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट, ऑक्सीमीटर, मास्क शिल्ड यांचा पुरवठा करण्यात आला आहे.

बाधित झालेल्या पोलिसांना रेमडेसिविर या इंजेक्शनसाठी पोलीस आयुकत अमिताभ गुप्ता यांनी स्वत: अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क केल्यानंतर रेमडसिविर इंजेक्शनचा १० टक्के वाटा फ्रंटलाईन वर्कर्ससाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त गुप्ता हे स्वत: झुम मिटिंगद्वारे बाधितांशी संपर्क साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेत आहेत व त्यांचे मनोबल वाढवित आहेत असे गुप्ता यांनी ‘पोलीसनामा’ला सांगितले .

२०५९ बाधित पोलीस

शहर पोलीस दलात पहिल्या पोलीस अंमलदारांना १६ एप्रिल २०२० रोजी कोरोना संसर्ग झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत २ हजार ५९ पोलीस बाधित झाले आहेत. सध्या २७२ पोलीस अधिकारी व अंमलदारांवर उपचार करण्यात येत आहे. या काळात १ पोलीस अधिकारी व १२ पोलीस अंमलदार यांचे निधन झाले आहे.

पोलिसांना अडचण आल्यास साधा संपर्क

सहायक पोलीस आयुक्त सुनिल यादव – ९९२३४६१९५५, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक – ९८२३२२६१४५, पोलीस उपनिरीक्षक गौरव देव – ९५११२०००६६, सुशिल डमरे – ८८८८८५७४२४, सुमषा मोरे ८८०५०००८२१