पुणे पदवीधर मतदारसंघ : ‘केडर’च्या शिस्तीखाली निष्ठवंतांना डावल्यामुळे ‘सुशिक्षितां’नी दाखवला ‘कात्रजचा’ घाट, मानहानीकारक पराभव ‘पाटील’ आणि भाजपच्या ‘शिर्षस्थ’ नेतृत्वाला आत्मपरिक्षण करायला लावणारा

पुणे – ‘केडर’च्या शिस्तीखाली निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलणे आणि शिवसेनेशी तोडलेल्या युतीमुळे ‘सुशिक्षित’ मतदारांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भाजप नेतृत्वाला ‘कात्रजचा’ घाट दाखवला असल्याचं चित्र आता समोर आले आहे.

पुणे मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पहिल्याच फेरीत जवळापास 50 हजार मतांनी दणदणीत पराभव केला. कार्यकर्त्यांना कायमच निवडणूक ‘मोड’वर ठेवणाऱ्या भाजपला यंदा प्रथमच सपाटून मार खावा लागला आहे. विशेष असे की याच मतदार संघातून 2 वेळा आमदार आणि मंत्री आणि विद्यमान प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत हा मानहानीकारक पराभव ‘पाटील’ आणि ‘शिर्षस्थ’ नेतृत्वाला आत्मपरिक्षण करायला लावणारा आहे. तर दुसरीकडे तीन पक्षांनी एकत्र येऊन लढलेल्या या पहिल्याच मोठया निवडणुकीत एकदिलाने काम केल्याने पाच वर्षपूर्वीं पश्चिम महाराष्ट्रातील बालेकिल्ल्यात शिरलेल्या भाजपला ‘कात्रज’चा घाट दाखवण्याची जबरदस्त तयारी केल्याचे पाहायला मिळत आहे.

यापूर्वी झालेल्या पदवीधर मतदार संघातील दोन निवडणुकांमध्ये भाजपचे विद्यमान प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील विजयी झाले होते. दोन्ही वेळा भाजप शिवसेना युतीने निवडणूक लढल्याने अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघडीला त्यांच्याच बालेकिल्ल्यात धूळ चारली होती.

परंतु मागील वर्षभरात भाजप सेना युती तुटल्यानंतर सगळीच राजकीय समीकरणे बदलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार असलेल्या भाजपला सोडचिट्ठी देत शिवसेनेने मागील वर्षी दोन्ही काँग्रेस सोबत महाविकास आघाडी चे सरकार स्थापन केले. निवडणूक निकालानिमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातील ‘सुशिक्षित’ मतदारांनी एकप्रकारे या आघाडी सरकारवर विश्वास व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.

स्ट्रॉग केडर बेस पक्ष म्हणून गणल्या जाणाऱ्या आणि त्याच पद्धतिने सर्व आयुधांसह निवडणूक लढणाऱ्या भाजपच्या पराभवामागे अन्य कारणेही असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. कार्यकर्त्यांना कायम निवडणुकीच्या ‘मोड’वर ठेवून पक्ष कार्यात जुंपवून ठेवायचे आणि ऐनवेळी आयात उमेदवार लादायचा ही कार्यपद्धती अनेकवर्षं प्रामाणिक पणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आता ‘जोखड’ वाटू लागली आहे. संग्राम देशमुख हे काही वर्षांपूर्वीच काँग्रेस मधून भाजप मध्ये आले. त्यांच्या घरात एक विधान परिषद सदस्य असताना पुन्हा त्यांच्याच घरात उमेदवारी देणे प्रामाणिक कार्यकर्त्यांना आणि मतदारांना रचलेले नाही. त्यामुळे शरीराने नेत्यांच्या अवतीभवती फिरणारे कार्यकर्ते मनावरील ‘जोखड’ दूर सारत असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यासारख्या शहरात भाजपची सर्वाधिक ताकत असताना येथील इच्छुकांना डावलण्यात येत आहे. त्यामुळे कार्यकर्ते ही नाराज आहेत.

युतीमध्ये पुणे वगळता पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा येथे शिवसेनेची ताकत ही कायमच भाजप पेक्षा अधिक राहिली आहे. यंदा शिवसेना महाविकास आघाडी मध्ये असल्याने दोन्ही काँग्रेसला अधिकचे बळ मिळाले आणि भाजपने ‘हाईप’ केलेली निवडणूक एकतर्फी झाली. महाविकास आघाडीमध्ये जेमतेम वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे उद्धव ठाकरे यांनी वर्षभराच्या कालावधीत कोरोना, अतिवृष्टी सारखी गंभीर संकटे सर्व मित्रपक्षांना सोबत घेऊन संयम आणि कुशलतेने हाताळल्याने जनतेमध्ये त्यांची लोकप्रियता नक्कीच वाढली आहे. याचाही फायदा महाविकास आघाडीला पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषतः सुशिक्षित मतदारांनी सरकारच्या कारभाराला दिलेली ही पोच पावती शहरी तोंडवळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भाजप नेतृत्वाला विचार करायला लावणारी असल्याचे या निकालातून समोर आले आहे.