Pune : ICU विभागातील कोरोना रुग्णाची आत्महत्या, तळेगावात प्रचंड खळबळ

तळेगाव दाभाडे: पोलीसनामा ऑनलाइन – अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाने स्टोअर रूममध्ये टेलिफोन वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली. तळेगाव दाभाडे येथील डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयात रविवारी (दि. 9) सकाळी 7 च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे मावळ तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

सोमनाथ तुकाराम हुलावळे (44, रा.कार्ला) असे आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ हुलावळे यांना शनिवारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांच्यावर कोरोनाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. या विभागात एकूण 19 रुग्णांवर उपचार सुरू होते. हुलावळे यांनी अतिदक्षता विभागातील नजीकच्या स्टोअर रूममध्ये फॅनच्या हुकाला टेलिफोन वायरच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद हुलावळे आणि नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. शरद हुलावळे म्हणाले, सोमनाथ हुलावळे यांच्या आत्महत्येस रुग्णालय व्यवस्थापनाचा गलथान कारभार आणि हलगर्जीपणाच कारणीभूत आहे. रुग्णालयात आत्महत्येसारख्या घटना घडेपर्यंत रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी काय झोपले होते का? रुग्णालय व्यवस्थापनावर कडक कारवाई करावी. आपल्या चुलत्याच्या मृत्युस हॉस्पिटल प्राशसन जबाबदार असल्याचा आरोप दिनेश हुलावळे यांनी केला आहे. या प्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. वामन गेंगजे यांनी शवविच्छेदन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गांनाथ साळी तपास करत आहेत.