भरदिवसा बंद फ्लॅट फोडणार्‍याला सतर्क शेजार्‍यांनी पकडलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात घरफोड्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. पण, कोंढव्यात भरदिवसा बंद फ्लॅट फोडणार्‍या चोरट्याला सतर्क शेजार्‍यांनी पकडले आहे. परंतु, त्याच्या दोन साथीदरांनी घरातील साडे आठ लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. गुरूवारी दुपारी हा थरार घडला आहे.

नाझीम इस्लाममुद्दीन अन्सारी (वय 35, रा. येरवडा) असे पकडण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याला अटक केली आहे. तर, त्याचे दोन साथीदार पसार होण्यात यशस्वी झाले आहेत. याप्रकरणी समीर शेख (वय 43, रा उंड्री) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हे उंड्री परिसरातील विद्यानिकेतन सोसायटीत राहण्यास आहेत. दरम्यान, गुरूवारी ते कामानिमित्त कुटूंबियासह घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्यादरम्यान, दुपारी साडे पाच वाजण्याच्या सुमारास तीन चोरटे त्यांच्या घरात शिरले. त्यांनी कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच, ते घरातील वस्तूांचा शोध घेताना फिर्यादींच्या शेजारी राहणारे विजय चव्हाण यांना आवाज आला. यामुळे त्यांनी पाहिले असता त्यांना अनोळखी व्यक्ती घरात शिरल्याचे लक्षात आले. त्यांनी गणेश राऊत यांना मदतीला घेऊन यातील चोरटा नाझीम याला पकडले. तर, त्यांचे दोन साथीदार पसार झाले. त्याला पकडून त्यांनी कोंढवा पोलीसांशी संपर्क साधला. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती घेतल्यानंतर त्यांच्या घरातून साडे आठ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करून नाझीम याला अटक केली. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

विजय चव्हाण यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे चोरट्याला पकडण्यात यश आले आहे. याबद्दल त्यांचे कौतुक होत असून, पोलिसांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे. पुण्यात सीसीटीव्ही तसेच वेगवेगळ्या माध्यमातून या चोरट्यांवर पोलिसांकडून लक्ष केंद्रीत केले जात आहे. परंतु, हे चोरटे पोलिसांना कसलाच थांगपत्ता लागू देत नसल्याचे आतापर्यंतच्या घटनांवरून दिसत आहे.