Lockdown 5.0 : भल्याभल्यांवर सोनं विकायची वेळ, ‘त्या’ जागतिक मंदीपेक्षा देखील वाईट परिस्थिती

पुणे : राजेंद्र पंढरपुरे – कोरोनाच्या संकटाने साऱ्या जगाचे अर्थकारण बदलून टाकले आहे. भारतात तर असंख्य लोकांचा रोजगार बुडाला, नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे. छोट्या मोठया व्यावसायिकांवर गंडांतर आले आहे. आर्थिक स्थिती सुधारण्याची चिन्हेही दिसेनात. अशा परिस्थितीत अस्तित्वासाठी सोनं विकायची वेळ अनेकांवर आली आहे.

भारतीय मानसिकतेत सोने हा संवेदनशील विषय असतो. सणावाराला सोनं खरेदी करून सोनं वाढवायचं असा कल् असतो. सोन्याचांदीच्या दागिन्यांवरून ऐश्वर्य मोजलं जाते. जगभरात चालणार स्थिर चलन म्हणून व्यवहारात सोन्याला महत्त्व असते, याही कारणाने सोन्यात गुंतवणूक केली जाते. आर्थिक चणचण भासली तर कदाचित सोने गहाण ठेवून पैसे उभे केले जातात. पण, सोने विकले जात नाही. सोने विकायची वेळ येणं, आर्थिक घसरणीचे चिन्ह असते. त्यातही महिलेच्या अंगावरील दागिने विकणे म्हणजे अपराध वाटतो.परंतु सध्या सोने विकायची वेळ अनेक उच्च मध्यमवर्गीयांवर आली आहे. वीस पंचवीस लाखाच्या वार्षिक पॅकेजवर काम करणाऱ्यांना निम्म्या दरातच काम करावे लागणार आहे, आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत नोकऱ्या राहातील पण पगार दिला जाणार नाही असे निरोप लघु आणि मध्यम उद्योजकांनी अधिकारीवर्गाला दिले आहेत. उद्योग समुहांनी वीस ते पन्नास टक्क्यापर्यंत वेतन कपात केलेली आहे.

या स्थितीत घरासाठी, वाहनासाठी, छोट्या व्यवसायासाठी कर्जे घेतलेल्यांना कर्जाचे हप्ते मात्र वेळेत फेडावे लागताहेत. हप्ता चुकला तर व्याज वाढत जाते, ती भिती असते. मुलांच्या शिक्षणावर प्रचंड खर्च करावा लागतो. भरमसाठ शुल्क, महागडी वसतिगृहे, शैक्षणिक बाबींसाठीची खरेदी ही प्रामुख्याने मे ते जुलै महिन्यातच करावी लागते. कर्जफेड, शैक्षणिक खर्च, औषधोपचारावरील खर्च, दैनंदिन खर्च भागविताना कसरत करावी लागते आहे आणि याकरिता सोने विकले जात आहे.

शहराच्या मध्यवस्तीतील सराफ व्यावसायिकाने सांगितले की सोने खरेदी जवळ जवळ थांबली आहे पण घरातले सोने विकण्यासाठी माझ्याकडे ग्राहक येतात. काहींना प्रत्यक्ष येऊन सोने विकायची लाज वाटते असे ग्राहक मध्यस्थामार्फत सोने विकतात. यात मध्यस्थाला एक किंवा दोन टक्के फायदा मिळून जातो. सध्या सोन्याला भाव चांगला मिळत असल्याने सोनं विकायला येणारे खूप आहेत. घरातले सोने विक्रीचा मारा वाढल्याने दर घसरण्याची शक्यता आहे.
जागतिक मंदी 2009-2010 च्या सुमारास आली होती, तेव्हासुध्दा सोने विकून घर चालविण्याची वेळ आली नव्हती, कोरोनाच्या संकटाने ही वेळ आणली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like