पुण्यातील ‘या’ कंपनीनं केला ‘व्हायरस’ला रोखण्याचा दावा, शोधली ‘कोरोना’वर 3 औषधं !

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन –  जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील बहुतांश देशांनी लॉकडाऊन घोषित केला आहे. कोरोना विषाणूवर अद्याप कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध झालेली नाही. प्रत्येक देश कोरोनावर औषध शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तर अनेक देशांनी औषध तयार शोधल्याचा दावा केला असून काही कंपन्यांनी मानवी चाचण्या घेण्यास सुरुवात केली आहे.

अशा परिस्थिती नोव्होलीड या पुण्याच्या कंपनीने कोरोनावर प्रभावी ठरणारी तीन औषधं शोधल्याचा दावा केला आहे. काही महिन्यांच्या संशोधनानंतर कोरोनावर ही औषधं प्रभावी ठरली असून त्याच्या मानवी चाचणीसाठी परवानगी मागितल्याचा दावा या कंपनीने केला आहे. कंपनीच्या या दाव्यामुळे भारतातल्या रुग्णांसाठी नवा आशेचा किरण निर्माण झाला आहे.

या संदर्भात कंपनीने म्हटले आहे की, कोरोना व्हायरस विरोधात जगभरात 2200 औषधांचा वापर करण्यात येत आहे. त्या सर्व औषधांचा अभ्यास केल्यानंतर कोरोनावर प्रभावी ठरणारी तीन औषध मिळाल्याचा दावा कंपनीने केला आहे. या औषधांच्या मानवी चाचणीसाठी परवानगी मागितल्याचा दावा देखील कंपनीने केला आहे. दरम्यान, पुण्यात कोरोना व्हायरसवर आणि त्यासाठी लागणाऱ्या टेस्ट किटवर अनेक कंपन्या संशोधन करत आहेत.

भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 90 हजाराच्या वर गेली आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे 30 हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, मालेगाव, औरंगाबाद या प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने रविवारी राज्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा हा चौथा टप्पा आहे.