Pune : कोंढव्यातील वेलफेअर हॉस्पिटलचा ‘फार्मासिस्ट’ अन् हडपसरमधील ‘परिचारिका’ 30 हजाराला विकत होते ‘रेमडेसिवीर’, कोंढवा पोलिसांकडून अटक अन् 7 इंजेक्शन जप्त

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना बाधितांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या फॉर्मासिस्टला ही इंजेक्शन पुरविणार्‍या परिचारिकेला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.

रिबिका विनोद वैरागर (वय ३५, रा. मासाळ चाळ, पिसोळी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे तिच्याकडून ७ रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केले आहेत. रिबिका ही हडपसर येथील एका खासगी कोविड सेंटरमध्ये परिचारिका म्हणून काम करीत आहे. अंकित विनोद सोलंकी (वय २६, रा. सुखवानी कॉम्प्लेक्स, दापोडी) वेलफेअर हॉस्पिटलच्या या फार्मासिस्टला कोंढवा पोलिसांनी अगोदर अटक केली होती.

कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांना अंकीत सोलंकी हा कोंढव्यातील जायका हॉटेलजवळ रेमडेसिविर इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सय्यद यांनी साध्या वेशामध्ये तपास पथकातील अधिकारी उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे व पोलीस अंमलदार यांच्या पथकाला बनावट ग्राहक तयार करुन इंजेक्शन घेण्यास पाठविले. यावेळी सोलंकी याने अंमलदाराला जायका हॉटेलच्या बाजूला नेऊन त्यांना दोन इंजेक्शन दाखविले एका इंजेक्शनसाठी १० हजार रुपयांची मागणी केली तसेच एका इंजेक्शनसाठी १० हजार रुपये रोख स्वीकारले. नंतर १० हजार रुपये ऑनलाईन स्वरुपात मागणी करत होते. यावेळी पोलिसांनी छापा टाकून वेलफेअर हॉस्पिटलच्या या फार्मासिस्टला पकडले होते.

अंकित सोलंकी याने अगोदर पोलिसांची सातत्याने दिशाभूल केली. इंजेक्शन कोठून मिळविली, याची त्याने वेगवेगळी कारणे सांगितले. ती सर्व खोटी निघाली. त्यानंतर त्याच्याकडे पोलिसांनी आपल्यापद्धतीने चौकशी केल्यावर त्याने खरा प्रकार सांगितला.

त्याला पकडले, त्याच्या अगोदर त्याचा एका महिलेला फोन झाला होता. त्याबाबत चौकशी केल्यावर या महिलेने इंजेक्शन आणून दिल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अंकितला पुन्हा या महिलेला फोन करायला सांगितले. त्यानुसार त्याने फोन केल्यावर ती ४ इंजेक्शन घेऊन आली. पोलिसांनी तिला पकडले. तिच्याकडे चौकशी केल्यावर धक्कादायक प्रकार समोर आला.

रिबिका ही हडपसर येथील एका कोविड सेंटरमध्ये परिचारिका म्हणून कामाला आहे. कोविड रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शनचा ६ इंजेक्शनचा कोर्स असतो. त्यापैकी २ इंजेक्शन पहिल्या दिवशी दिली जातात व नंतर दररोज एक अशी पुढील चार दिवस एक एक इंजेक्शन दिले जाते. हे काम परिचारिकाच करतात.

यादरम्यान रुग्णाला पहिल्या दिवशी इंजेक्शन देताना ही दोन ऐवजी फक्त एकच इंजेक्शन देत असे. दुसरे इंजेक्शन ती चोरत असे. त्यानंतर ती ते बाहेर काळाबाजारात विकत असे.

कोंढवा पोलीस ठाण्याचे तपास पथकातील उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे यांनी पोलिसनामा ऑनलाईनला सांगितले की अंकित याला पोलिसांनी अटक केली. तेव्हा त्याच्याकडे २ इंजेक्शन होती. आणखी एक इंजेक्शन त्याच्या गाडीच्या डिकीत मिळाले. याशिवाय वापरलेल्या इंजेक्शनच्या ५ बाटल्या डिकीत आढळून आल्या.त्यादरम्यान आणखी कसून चौकशी केली असता त्यांनी ऍक्टिमरा इंजेक्शने जे कोविडच्या क्रिटिकल रुग्णांना दिले जाते त्याची बाजारात अधिकृत किंमत15 हजार आहे ते त्या इंजेक्शन 30 हजारात विकत काळा बाजार करत होता .

पोलिसांनी सांगितले की सदर गुन्ह्या बाबत हॉस्पिटलचे संचालक, डॉक्टर्स व त्यांचे पार्टनर व स्टाफ यांची ही चौकशी करण्यात येईल.आरोपींना कोणी मदत केली आहे का . त्यात इंजेक्शनच्या आणखीन काळाबाजार उजेडात येण्याची शक्यता आहे. तसेच रिबिकाकडील ४ इंजेक्शन अशी ७ इंजेक्शन पोलिसांनी जप्त केली आहेत. पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे अधिक तपास करीत आहेत.