पिंपरी : राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दुचाकी दिवसाढवळ्या पळवली

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाची दुचाकी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोरून चोरून नेल्याचा प्रकार दापोडी येथे उघडकीस आला आहे. नगरसेवक राजू बनसोडे यांच्या दापोडी येथील जनसंपर्क कार्यालयासमोरून 4 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता दुचाकी चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या वाहनचोरांनी शहरात धुमाकूळ घातला आहे. रोज 3-4 वाहनं चोरीला जाताना दिसत आहेत. पोलिसांसमोर आता वाहनचोरांच्या मुसक्या आवळण्याचं आव्हान उभं ठाकलं आहे.

नगरसेवक राजू विश्वनाथ बनसोडे (वय 40 राहणार सीएमई गेटसमोर, जाधव चाळ, दापोडी) यांनी या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरसेवक बनसोडे यांनी त्यांची 15 हजार किंमतीची मोपेड दुचाकी पुणे-मुंबई महामार्गावर सीएमई गेटसमोर असलेल्या जनसंपर्क कार्यालयासमोर 3 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचं लॉक तोडून ती पळवून नेली. हा प्रकार 4 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता उघडकीस आला. याबाबत 9 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनसोडे यांच्या कार्यालयासमोर लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. तिथे मोठी सुरक्षा असते. तसंच हा रस्ता वर्दळीचा असूनही चोरी झाल्याचं आश्चर्यव्यक्त केलं जात आहे. शहरात रोज वाहनचोरीच्या घटना समोर येत आहेत. यामुळं यावर अंकुश ठेवण्यात पोलिसांनी यश येत नाही असं दिसत आहे. त्यातच आता कृष्णप्रकाश यांनी पदभार घेतला असून त्यांना तरी या चोऱ्या रोखण्यात यश येतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.