Pune / Pimpri : आकर्षक परताव्याच्या आमिषाने बांधकाम व्यावसायिकाने केली 17 कोटींची फसवणूक; डी. एस. के. अँड असोसिएटचे भागिदार अन् नोटरीसह 7 जणांवर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी वेगवेगळे करारनामे करुन तब्बल १७ कोटी ७० लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक, नोटरीसह ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

दीपक सखाराम कोहकडे, त्यांची पत्नी भारती कोहकडे, मुलगा अश्विनीकुमार कोहकडे (सर्व रा. सोपानबाग, बालेवाडी) कोहकडे यांचा मेव्हणा अनंता भिकुले (रा. बालवाडी), कोहकडे यांचा मार्केटिंग एक्झिकेटिव्ह स्रेहल ओसवाल (रा. वानवडी), भागीदार हर्षद अशोक कुलकर्णी (रा. रेव्हेन्यू, गांधीभवन, कोथरुड) आणि नोटरी अशिष ताम्हाणे (रा. बाणेर) व इतर साथीदार अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी संदीप सुधीर जाधव (वय ४०, रा. विरभद्रनगर, बाणेर) यांनी हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. दीपक कोहकडे यांची डी. एस. के. अँड असोसिएट ही भागीदारी कंपनी आहे. तर संदीप जाधव हे ठेकेदार आहेत. कोहकडे याने जाधव यांना एप्रिल २०१९ मध्ये आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून निरनिराळ्या मुदत ठेवींच्या मोठ मोठ्या रक्कमा स्वीकारल्या. सुरुवतीला काही ठेवीवर परतावा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आणखी जादा रक्कमेच्या मुदत ठेवी ठेवण्यास भाग पाडून मुदत ठेव रक्कमेचे ८ वेगवेगळे लेखी नोटराईज करारनामे केले.

करारानुसार गुंतवलेल्या रक्कमेचा परतावा न देता त्यांनी अटी व शर्तींचा भंग केला. त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांना पुन्हा विश्वासात घेऊन पूर्वीच ठेवीचे ८ करारनामे रद्द करुन त्याबदल्यात ९ वा तडजोडीचा करारनामा केला. नंतर हा करारनामा रद्द करुन अंतीम १० वा व ११ वा करारनामा करुन फिर्यादी व साक्षीदार यांना ठेवीवर जादा व आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतरही त्यांनी करारनाम्यातील शर्तींचा भंग करुन त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ केली. फिर्यादीने गुंतविलेल्या रक्कमेतून काहकडे याने देशापरदेशात मालमत्ता खरेदी केली. फिर्यादीने पैशांची मागणी केल्यावर त्यांना वकिलामार्फत नोटीस पाठवून त्यामध्ये दीपक कोहकडे यांना काही झाल्यास अथवा मृत्यु आल्यास तो मृत्युपूर्व जबाब असेल असे नमूद करुन धमकी दिली आहे.