पुण्यात ड्युटीवर निघालेल्या पोलिसाला मारहाण, जखमी अवस्थेत फेकलं खड्ड्यात

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने आणि लॉकडाऊन लागू असल्याने पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्व पोलिसांच्या साप्ताहिक सुट्ट्या, रजा रद्द करण्यात असून त्यांना कामावर तैनात राहण्यास सांगण्यात आले आहे. पोलीस दिवसरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर राज्यात हल्ले होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. चाकण पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला रात्रपाळीच्या ड्युटीवर जाताना अडवून बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण केल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याला रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हा प्रकार मंगळवारी (दि.21) रात्री साडेआठच्या सुमारास आळंदी येथील रासे गावालगत घडला. इंद्रकुमार तुकाराम धोत्रे (वय-30 रा. आळंदी) असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. धोत्रे हे मंगळवार रात्री रात्रपाळीच्या ड्युटीसाठी जात असताना त्यांना तीन अनोळखी इसमांनी अडवले. त्यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून त्यांच्याकडील रोकड आणि मोबाइल लुटल्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत रस्त्यालगतच्या खड्ड्यात फेकून दिले.

याप्रकरणी इंद्रकुमार धोत्रे यांनी तीन अनोळखी हल्लेखोरांविरोधात चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी धोत्रे यांना रात्रपाळी असल्याने ते दुचाकीवरून आळंदी येथून चाकणच्या दिशेने येत होते. दरम्यान, आळंदी घाटात तिघांनी अचानक त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. आरोपींनी लाकडी दांडक्याने धोत्रे यांना बेदम मारहाण केली. तसेच धोत्रे यांच्या खिशातील चार हजार रुपयाची रोकड आणि मोबाइल असा एकूण ९ हजार रुपयाचा ऐवज कढून घेतला. त्यानंतर आरोपींनी धोत्रे यांना रस्त्यालगतच्या खड्ड्यात फेकून देत घटनास्थळावरून पळून गेले.

हा प्रकार घडल्यानंतर काही वेळाने तेथून अन्य एका पोलिसाने धोत्रे यांची दुचाकी रस्त्याच्या बाजूला पडलेली बघितली. त्यानंतर धोत्रे यांचा शोध घेतला असता ते रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जखमी अवस्थेत पडलेले दिसले. त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. धोत्रे यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींच्या तपास सुरु केला असून आरोपींच्या शोधासाठी पथकं रवाना करण्यात आली आहे. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.