पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | दारु पिल्यानंतर त्यांनी जेवण केले. त्यावेळी दुपारचे वेळेस राहिलेले चांगले जेवण आणि खालेले खरकटे जेवण एकत्र एकाच पिशवीत पॅक केले. यावरुन झालेल्या वादात एकाने मित्राला चौथ्या मजल्यावरुन ढकलून देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. (Attempt To Murder)
या घटनेत धीरज कुंटे (वय २५, रा. निघोजे, ता. खेड) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयातील अति दक्षता विभागात उपचार करण्यात येत आहे. ही घटना निघोजे येथील आशिष येळवंडे यांच्या इमारतीमधील भाड्याच्या खोलीत चौथ्या मजल्यावर शनिवारी रात्री आठ वाजता घडली.
याप्रकरणी कृष्णा केशव हिंगणे (वय १९, रा. निघोजे) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Mahalunge MIDC Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अतिश चंदु गायकवाड (वय ३४, मुळ रा. राहुलनगर, अकोला) याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जायभाये यांनी सांगितले की, यातील जखमी धीरज कुंटे याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. यातील जखमी व आरोपी आणि त्यांचे साथीदार हे विदर्भातील विविध शहरांमध्ये राहणारे आहेत. येथील कंपन्यांमध्ये ते कामाला असून भाड्याने खोली घेऊन रहात आहेत. अतिष व धीरज कुंटे यांचे रुम पार्टनर कामाला गेले होते. दोघेच रुमवर होते. त्यांनी सायंकाळपासून दारु पिण्यास सुरुवात केली. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी जेवण केले. त्यावेळी अतिष याने दुपारचे वेळेचे राहिलेले चांगले अन्न व त्याने खावून उरलेले खरकटे अन्न एकत्र करुन एकाच पिशवीत पॅक केले. हे पाहून धीरज कुंटे याने त्यास तू जेवण एकत्र पॅक का केले, असे विचारले. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी अतिष हा रुममध्ये होता. धीरज हा खोलीतून बाहेर आला. त्याच्या मागोमाग अतिष आला. त्याने धीरजच्या अंगातील शर्टच्या कॉलरला धरुन त्याला चौथ्या मजल्यावरुन खाली ढकलून दिले. चौथ्या मजल्यावरुन खाली पडल्याने धीरज याच्या हातापायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तो अजून बोलण्याच्या स्थितीत नाही. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक जायभाये तपास करीत आहेत.