पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पायाजवळ वॉर्मर मशीन ठेवल्याने गुडघ्याखालील पाय जळल्याने दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यु झाल्याप्रकरणी चिखलीतील एका रुग्णालयातील तीन डॉक्टरांसह दोन परिचारिकांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ससून रुग्णालयातील समितीच्या अहवालात उपचारात हलगर्जीपणा झाल्याचे निष्पन्न झाल्याने दोषी डॉक्टर व परिचारिकांवर कारवाई करण्यात आली आहे. हा प्रकार गेल्या वर्षी १८ नोव्हेबर २०२३ रोजी चिखली येथील नेवाळे वस्तीतील इंम्पीरियल हॉस्पिटलमध्ये (Imperial Multispeciality Hospital in Chikhali) घडला होता.
दिरांश रमाकांत गादेवार (वय २) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. त्याची आई दिपाली गादेवार (वय ३६, रा. नेवाळे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात (Chikhali Police) फिर्याद दिली आहे. डॉ. जितेश मदनसिंग दोभाळ Dr. Jitesh Dobhal (वय ३६, रा. सेंट्रल पार्क रेसिडेन्सी, बोर्हाडेवाडी), डॉ. रजनिश जगदंबाप्रसाद मिश्रा (वय ३०, रा. चिखली), डॉ. रोहन प्राणहंस माळी (वय २६, रा. गणेशनगर, कॉलनी, चिखली), परिचारिका रेचल अनिल दिवे ( वय २६, रा. शिवनेरी, चिखली), सविता नंदकिशोर वरवटे (वय ३६, रा. पाटीलनगर, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
दिपाली यांचा मुलगा दिरांश याला सर्दी झाल्याने त्यास डॉ. दोभाळ यांच्या सल्ल्यानुसार चिखलीतील नेवाळे वस्ती येथील इम्पिरीयल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरु असताना १८ नोव्हेबर २०२३ रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास डॉ. मिश्रा, डॉ. रोहन हे दिरांशचे सॅम्पल घेण्यासाठी आले. त्यांनी दिपाली यांना बाहेर थांबण्यास सांगितले. त्यानंतर आठ वाजण्याच्या सुमारास दिपाली या पुन्हा मुलाजवळ आल्यावर त्यांना धक्काच बसला. दिरांशच्या पायाजवळ ठेवलेल्या वार्मर मशीनमुळे त्याचा गुडघ्याखाली पाय पूर्णपणे जळाला. त्यामुळे त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत दिपाली यांनी तक्रार केली होती. दिरांश याच्या उपचाराची कागदपत्रे ससून रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या समितीकडे पाठविण्यात आली. या समितीचा अहवाल नुकताच प्राप्त झाला. या अहवालात तीन डॉक्टर व दोन परिचारिका यांना उपचारात हलगर्जीपणा केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार चिखली पोलीस ठाण्यात तीन डॉक्टर व दोन परिचारिका यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गोमारे तपास करीत आहेत.