अलिशान गाड्या चोरणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड, पिंपरी-चिंचवडच्या गुन्हे शाखेनं जप्त केल्या सव्वा 2 कोटीच्या 12 गाड्या आणि 15 इंजिन (व्हिडिओ)

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – संपूर्ण भारतभर आलिशान गाड्या चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या एक नंबर पथकाने पर्दाफार्स केला आहे. इन्शुरन्स कंपनीकडून लिलावात घेतलेल्या गाड्यांचा चेसी नंबर आणि वाहन नंबर चोरीच्या गाड्यांना लावून गाड्या विकल्या जात होत्या. पोलिसांनी दोन कोटी १९ लाख रुपये किंमतीच्या १२ आलिशान गाड्या आणि १५ इंजिन जप्त केली.

चनप्रित हरविंदपाल सिंह (४३, रा. रावेत, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. रावेत येथे एक गॅरेज सुरु झाले असून तेथे असणाऱ्या गाड्या संशयित वाटत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक गणेश पाटील आणि कर्मचारी सचिन मोरे यांना मिळाली. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने त्या गॅरेज वर छापा टाकून सर्च केला. त्यावेळी त्या ठिकाणी इनोव्हा गाडी आढळून आली. त्या गाडीला मुंबई पासिंगचा नंबर होता तर ती मूळची पंजाब येथील असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी गोडाऊन सर्च केले असता अनेक गाड्यांची महागडे इंजिन आणि स्पेयर पार्ट आढळून आले. पोलिसांनी गॅरेज चालक, मालक चणप्रित सिंह याला अटक केली.

याच्याकडे कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. वेगवेगळ्या राज्यातून चोरीच्या गाड्या आणून त्या गाड्यांना दुसऱ्या गाड्यांचे पासिंग नंबर आणि चेसी नंबर टाकून विक्री केल्या जात होत्या. सिंह याने अश्याच प्रकारे चोरी करुन विक्री केलेल्या इनोव्हा, इर्टीगा, फॉरचूनर, हुंडाई वेरणा, स्वीट, पोलो अश्या दोन कोटी १९ लाख रुपये किमतीच्या १२ गाड्या आणि वेगवेगळ्या गाड्यांची १५ इंजिन जप्त केली आहेत.

कर्ज काढून घेतलेल्या गाड्यांचे हप्ते थकल्यानंतर इन्शुरन्स कंपनी आणलेल्या गाड्या लिलावात घेतल्या जात होत्या. त्यानंतर त्या गाड्यांचे नंबर आणि चेसी नंबर देण्यासाठी त्याच मॉडेलच्या गाड्या चोरण्यास सांगून त्या चोरल्या जात होत्या. या चोरलेल्या गाड्यांना इन्शुरन्स कंपनीकडून आणलेल्या गाड्यांचे नंबर लावून त्या लाखो रुपयांना विक्री केल्या जात होत्या.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उप आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक काळूराम लांडगे, पोलीस कर्मचारी रवींद्र राठोड, रवींद्र गावंडे, प्रमोद लांडे, बाळू कोकाटे, मनोजकुमार कमले, अमित गायकवाड, मारुती जायभाये, अंजनराव सोडगीर, महेंद्र तातळे, सचिन मोरे, सुनील चौधरी, प्रमोद हिरळकर, प्रमोद गर्जे, विजय मोरे, गमेश सावंत, तानाजी पानसरे यांच्या पथकाने केली.

विमानाने प्रवास आणि कमिशन चाळीस हजार…
चोरीच्या गाड्या परराज्यातुन आणण्यासाठी सिंह याला विमानाचे तिकीट दिले जात असे. तो विमानाने त्या राज्यात जाऊन तेथून रस्त्याने गाडी संबधीत ठिकाणी पोहच करत होता. यासाठी त्याला आलिशान एका गाडीसाठी चाळीस हजार रुपये दिले जात होते.