पुणे-पिंपरी : महिला पोलिस कर्मचारी दीड हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील एका महिला पोलीस कर्मचार्‍यास दीड हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे. काही वेळापुर्वी ही कारवाई करण्यात आली आहे. पुण्यासह पिंपरी-चिचंवड पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

संगिता गायकवाड (रा. सांगवी) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या महिला कर्मचार्‍याचे नाव आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
संगिता गायकवाड या पिंपरी-चिंचवड पोलीस दलात कॉनस्टेबल आहेत. सध्या त्यांची नेमणूक सांगवी पोलीस ठाण्यात आहे.

दरम्यान, यातील तक्रारदार यांनी भाड्याने दुकान घेतले होते. त्यांचा करार संपला होता. यावेळी मुळ दुकान मालकाने दुकान खाली करत नसल्याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीची चौकशी गायकवाड यांच्याकडे दिली होती. त्यावेळी तक्रारदार यांनी गायकवाड यांच्याकडे दोन दिवसात दुकान खाली करतो, असे सांगितले होते. त्यावेळी गायकवाड यांनी दोन दिवसात दुकान खाली करण्यासाठी तसेच यापुढे कोणतीही कारवाई न करण्यासाठी त्यांच्याकडे लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी याबाबत पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीची चौकशी करण्यात आली आहे. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, बुधवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास गायकवाड यांना तक्रारदार यांच्याकडून तडजोडीअंती 1 हजार 500 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.