चाकण : पोलीस ठाण्यातच तरुणीचा विष पिण्याचा प्रयत्न, केला पोलिसांवर गंभीर आरोप

चाकण/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न वापरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. चाकणमध्ये एका तरुणाने मास्क न लावल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. याकारवाईमुळे पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या तरुणीने विष पिण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार चाकण पोलीस ठाण्यात आज (रविवार) दुपारी घडला. अन्य एका प्रकरणात पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याच्या कारणावरुन तरुणीने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे.

चाकण पोलीस ठाण्यात विष पिण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचे नाव किरण पडवळ (वय-27 रा. चाकण) आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी याबाबत माहिती दिली, चाकण शहरातील महात्मा फुले चौकामध्ये चाकण पोलीस हे सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत होते. त्यावेळी एक तरुण दुचाकीवरुन जात असताना त्याने मास्क वापरला नव्हता. यामुळे पोलिसांनी त्याला अडवून त्याच्यावर कारवाई केली. पोलीस तरुणावर 188 कलमानुसार कारवाई करत होते. यासाठी त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

दरम्यान, त्या तरुणाने फोन केला. फोन केल्यानंतर तरुणी चाकण आली आणि तिने सोबत आलेले विष पिण्याचा प्रयत्न केला. सध्या तरुणीची प्रकृती चांगली असून अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांची चांगलीच धावाधाव झाली. दरम्यान, हे प्रकरण वेगळेच असल्याचे सांगण्यात येत आहे. मास्क न वापरल्यामुळे कारवाई केली हे फक्त निमित्त आहे. चाकण पोलीस ठाण्यातील एका फौजदाराने तरुणीकडे अडीच लाख रुपयाची मागणी केली होती. त्यापैकी काही रक्कम तरुणीने त्या फौजदाराला दिली आहे.

पोलिसांकडून उर्वरित पैशांसाठी मला आणि माझ्या नातेवाईकांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप तरुणीने केला आहे. तसेच पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आपण पोलीस ठाण्यात विष पिण्याचा प्रयत्न केल्याचे तिने सांगितले. तरुणीने पोलीस ठाण्यात विष पिण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहे. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकारी चौकशी करणार आहेत.