Pune : हडपसरमध्ये रस्त्यावर भाजीविक्रेत्यांना नियोजित जागा द्यावी – भाजीविक्रेत्या महिलांची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  सोलापूर रस्त्यावर हडपसरमध्ये भाजीविक्रेत्यांवर पालिकेच्या अतिक्रण विभागाकडून कारवाई करण्याऐवजी त्यांना नियोजित जागा उपलब्ध करून द्यावी. त्यानंतर पुन्हा कोणी रस्त्यावर भाजीविक्रीसाठी बसले, तर खुशाल कारवाई करावी, अशी मागणी भाजीविक्री करणाऱ्या महिलांनी केली.

उन्हाचा कार, कोरोना महामारीने जीव घाबरागुबरा होत आहे, पालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचारी भाजीपाल्याची नासधूस करतात. सांगा आम्ही जगायचे तरी कसे, असा सवाल रस्त्यावर भाजीपाला विक्री करणाऱ्या महिलांनी उपस्थित केला. दुपारी मांजरी उपबाजारातून चार-दोनसे रुपयांचा भाजीपाला आणतो, पन्नास-शंभर रुपये मिळतात, त्यावर गुजराण करतो. उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. त्यातही पालिकेचे अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांची भीतीने भाजीपाला घेऊन पळापळ करावी लागत आहे. आम्हालाही भयमुक्त आणि चांगले जीवन जगावे वाटते. पण, काय करणार आमच्या नशिबी नाही लिहिले, ते दिवस, अशी केविलवाणी व्यथा हडपसर गाडीतळ ते गांधी चौक दरम्यान बसणाऱ्या भाजीविक्रेत्यांनी मांडली.

साहेब, आमची दररोजची लढाई आहे. कोणी मदतीला येत नाही, उलट आम्हाला चार-दोन शिव्या देतात. वृद्ध महिलांचीही त्यांना कदर वाटत नाही. हातातून भाजीपाला हिसकावून नेतात. आमची कोणालाच कदर नाही, तर आम्ही न्याय तरी कोणाकडे मागायचा अशी 80 वर्षीय भाजीविक्रेत्या महिलने मांडली. त्यांच्याबरोबर तरुण मुलींसह मध्यमवयीन महिलाही त्यांचे गाऱ्हाणे मांडत होत्या. पालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांनी आमच्यासाठी सुरक्षित जागा द्यावी, अन्यता या ठिकाणी दोन तास भाजीविक्री करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी या भाजीविक्रेत्यांनी केली.