Pune : ‘एक झाड लावा आणि फुकट ऑक्सिजन मिळवा’ – हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे

पुणे : मागिल वर्षभरापासून कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. मागिल वर्षीपेक्षा यावर्षी रुग्णसंख्या वाढल्याने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जागा मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचे प्रचंड हाल होत आहेत. कोरोना महामारीमध्ये ऑक्सिजनअभावी रुग्णांवर उपचार करताना कसरत करावील लागत आहे. एक झाड लावा आणि आयुष्यभर ऑक्सिजन फुकट मिळवा. यासाठी आता प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करणे गरजेचे आहे, असे मत हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे यांनी व्यक्त केले.

जागतिक परिचारिका दिनानिमित्त हडपसरमधील (मगरपट्टा चौक) खासदार स्व. अण्णासाहेब मगर रुग्णालय, मगरपट्टासिटी लसीकरण केंद्र, गोंधळेनगरमधील पालिका बनकर विद्यालयातील स्वॅब सेंटर, अमानोरा येथील लसीकरण केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या सर्व परिचारिकांना एक रोप देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ईशान तुपे, डॉ. स्वाती घनवट, डॉ. सतिश सोनवणे, डॉ. अतुल कांबळे उपस्थित होते.

डॉ. जगदाळे म्हणाले की, मागिल वर्षभरापासून कोरोना महामारीमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांसह सर्वांनाच कसरत करावी लागली. त्यामध्ये परिचारिकांच्या कामाचा मोलाचा वाटा आहे. शासकीय आणि खासगी रुग्णालयांमधील सर्वांनाच काम करताना अनेक अडचणी आल्या. मात्र, त्या परिस्थितीतही त्यांनी रुग्णांवर उपचार करताना वेळेचे भान ठेवले नाही, ही बाब निश्चित कौतुकास्पद आहे, असे त्यांनी सांगितले.