Pune : ‘एक झाड लावा आणि नैसर्गिक प्राणवायू मिळवा’ – डॉ. राहुल झांजुर्णे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना महामारीमुळे मागिल काही महिन्यांपासून मानवी जीवाची ऑक्सिजनअभावी तडफड होत आहे. कोरोनाबाधित रुग्णाला हॉस्पिटलमध्ये कृत्रिम ऑक्सिजन मिळविताना प्रचंड कष्ट घ्यावे लागेल, ही वस्तुस्थिती प्रत्येकाने अनुभवली आहे. आमच्याकडे नैसर्गिक ऑक्सिजन देणारी वृक्षवल्ली जोपासली पाहिजे. त्यासाठी हडपसर मेडिकल असोसिएशनच्या वतीने कोरोनाबाधित रुग्ण बरा झाल्यानंतर त्यांना एक रोप देऊन त्याचे संगोपन करा आणि आयुष्यभर प्राणवायू फुकट मिळवा, असा संदेश दिला जात आहे. आता पावसाळा सुरू होत आहे, त्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावावा, असे असोसिएशनचे सचिव डॉ. राहुल झांजुर्णे यांनी सांगितले.

हडपसर मेडिकल असोसिएशन व वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्मयाने वृक्षारोपण करून प्राणाकडून प्राणवायूकडे असा संदेश देत जे. एस. पी. एम. कॉलेजच्या पाठीमाग असलेल्या २७ एकर जागेत १०० वृक्षांची लागवड करण्यात आली. येथे असलेल्या ऑक्सीजन उद्यानामध्ये कडुनिंब, पिंपळ, बहावा, शाल्मली, करंज, बेहडा, कांचनार, ताम्हण, नेवर, दीक्षा अशा अनेक प्रकारच्या देशी रोपांची लागवड केली असून, त्याचे संगोपण करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. याप्रसंगी हडपसर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ प्रशांत चौधरी, माजी अध्यक्ष डॉ. मंगेश वाघ, सचिव डॉ. राहुल झांजुर्णें, कोषाध्यक्ष डॉ. मनोज कुंभार, उपकोशाध्यक्ष डॉ. सतीश सोनवणे व वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.