Pune : भविष्यात ऑक्सिजन मिळविण्यासाठी वृक्ष लागवड करा – डॉ. प्रशांत चौधरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   वृक्षवल्ली आम्हा सगेसोयरे या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची प्रचिती कोरोना महामारीमध्ये प्राणवायू मिळत नसल्याने आता येऊ लागली आहे. आपण प्रत्येकाने शालेय जीवना प्रत्येक झाड कार्बनडाय ऑक्साईड शोषून हवेत ऑक्सिजन (प्राणवायू) सोडतात, याचा अभ्यास केला. मात्र, गांभीर्याने विचार गेला नाही, त्यामुळे आज ऑक्सिजन मिळत नसल्याने मानव सैरभैर झाला आहे. ऑक्सिजनची किंमत प्रत्येकाला समजू लागली आहे. त्यामुळे आता कोरोनाशी टक्कर देऊन बरे होणाऱ्या रुग्णाला एक झाड देऊन त्याचे संगोपण करण्यास सांगण्याचा अतिशय चांगला उपक्रम सुरू करण्यात आल्याचे हडपसर मेडिकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत चौधरी यांनी सांगितले.

लाईफकेअर हॉस्पिटलमधून कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन डिस्चार्ज देताना त्यांना एक झाड देऊन त्याचे संगोपन करण्याचा सल्ला देण्यात आला. याप्रसंगी हडपसर मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, सचिव डॉ. राहुल झांजुर्णे, कोषाध्यक्ष डॉ. मनोज कुंभार, डॉ. सचिन आबणे, डॉ. मंगेश वाघ, डॉ. प्रशांत पाटील व लाईफकेअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. कुणाल ओसवाल उपस्थित होते.

डॉ. प्रशांत चौधरी यांनी म्हणाले की, हडपसर असोसिएशन संघटना एवढ्यावरच थांबणार नाही, तर परिसरातील सर्वच वैद्यकीय संघटना व वारकरी सांप्रदायातील मंडळींशी संपर्क साधणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर पंढरपूरपर्यंत वृक्षारोपण करून वृक्षदिंडी हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. जगदाळे यांनी सांगितले की, हडपसर मेडिकल असोसिएशनने कोरोना महामारीवर मात करण्यासाठी कोव्हिड सेंटर सुरू केले आहेत. ऑक्सिजन बेड व इतर मदत करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. तसेच भविष्यात ऑक्सिजन मिळत नाही अशी परिस्थिती उद््भवू नये, यासाठी प्राणवायूकडून प्राणवायूकडे हा अनोखा उपक्रम हडपसर मेडिकल असोसिएशनने सुरू केला आहे. असोसिएशनच्या सभासद संचलित कोव्हिड हॉस्पिटलमधून बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांना एक रोपटं दिले जात आहे. ऑक्सिजनचे (प्राणवायू) रूग्णंच महत्त्व इतरांनाही समजून सांगणार आहे. अशा प्रकारचा अनोखा उपक्रम राबविण्यात हडपसर मेडिकल असोसिएशनचे पहिले पाऊल उचलले आहे, त्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. पर्यावरणाबद्दल जनजागृती करणारी पुण्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील पहिली वैद्यकीय संघटना आहे, असे त्यांनी सांगितले.