Pune : PM मोदी अन् UP चे CM योगी यांचे फोटो मॉर्फ करून बदनामी; राष्ट्रवादी युवकच्या प्रदेश सचिवासह होलार समाज संघटनेच्या संस्थापक अध्यक्षाविरूध्द FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटो मोर्फकरून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव व स्वाभिमानी होलार समाज संघटनेच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्पूर्वी पुण्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व जेष्ठ नेते शरद पवार यांची बदनामी केल्याप्रकरणी नुकताच 13 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात याप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव मोहसीन ए शेख आणि स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव जावीर यांच्या विरोधात IPC 469, 500 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विनीत भरत कुमार बाजपेयी (वय 38) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहसीन शेख हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आहे. तर जावीर हे होलार समाज संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटो आक्षेपार्हरीत्या मॉर्फ करून ते फेसबुक या सोशल मीडियावर प्रसिद्ध केले. तसेच, घटनात्मक पदाचा व प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या लोकविकास बाधा आणणारे सत्य जाणून-बुजून करून त्यांची बदनामी केली. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सायबर पोलिस करत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बदनामी केल्या प्रकरणी 13 जणांवर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.