पुणे : महापालिकेला आर्थिकदृष्टया 40 कोटींना खड्ड्यात घालणारा निर्णय भाजपानं बहुमताच्या जोरावर घेतला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी महापालिकेला आर्थिक दृष्ट्या 40 कोटी रुपये खड्ड्यात घालणारा निर्णय आज सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर सर्वसाधारण सभेत घेतला. बांधकाम व्यावसायिकांनी त्यांच्या स्कीमसाठी स्वखर्चातून मुंढवा – खराडी दरम्यान मुळा – मुठा नदीवर पुल बांधायची तयारी दर्शवली होती. मात्र सत्ताधाऱ्यांनी मात्र हा पुल पालिकेच्या खर्चातून बांधण्यासाठी रस्त्याची आखणी आणि बांधकामाचा खर्च करण्याचा प्रस्ताव मंजूर करत आज अक्षरशः त्यावर कडी केली.

मुंढवा येथे बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर जमिनी घेऊन त्या ठिकाणी स्कीम सुरू केल्या आहेत. या स्कीम पासून खराडी मार्गे शहरात येण्यासाठी या बांधकाम व्यावसायिकांनी नदीवरील पुलाचे काम करण्याची तयारी दर्शवली होती. पीएमारडीएने तशी परवानगीही दिली होती. केवळ पालिका हद्दीतील जोड रस्त्याचे काम करण्यासाठी हा रस्ता आखून मिळावा यासाठी पालिकेकडे कडून परवानगी मिळावी असा अर्ज पीएमआरडीएने पालिकेकडे केला होता. दरम्यान, मुंढव्याचा पालिकेत समावेश झाल्यानंतर संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी हा रस्ता करण्यास असमर्थता दर्शवली.

मात्र पालिका प्रशासनाने हा रस्ता आखण्याची तयारी दर्शवली. विशेष असे की मागील शहर सुधारणा समिती ने हा प्रस्ताव नामंजूर करत परत प्रशासनाकडे पाठवला होता. परंतू यानंतरही प्रशा सनाने नवीन समितीपुढे सप्टेंबर मध्ये पुन्हा हा प्रस्ताव ठेवला. या समितीनेही पूर्वीचीच भूमिका कायम ठेवत प्रस्ताव परत पाठवला. मात्र चारच दिवसांत पुन्हा हा प्रस्ताव समितीपुढे ठेवण्यात आला आणि समितीने तो मंजूरही केला. बांधकाम वायवसायिकाशी असलेल्या साटेलोट्या मुळे हा प्रस्ताव मंजूर केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. आज हा प्रस्ताव मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेपुढे चर्चेसाठी ठेवण्यात आला होता.

या प्रस्तावाला विरोध करताना नगरसेवक भय्यासाहेब जाधव म्हणाले विकासकाने स्वखर्चातून बांधण्याचा प्रस्ताव दिला होता, हा रस्ता पालिकेत आल्यावर तो माघार घेतो. विकासकाचे पैसे वाचावे त्याच्या फायद्यासाठी हा पूल पालिका करणार ? जवळच डीपी मध्ये 100 मी रस्त्याला पूल जोडत आहे. केवळ विकासकासाठी हा पूल बांधायचा. शहरसुधारणा समिती मध्ये मला बोलू दिले गेले नाही. हा पूल करण्यास माझा विरोध आहे. सध्याचा पूल 80 फूट रस्त्याला जोडणार आहे. ते योग्य नाही. याकामासाठी पालिकेचे 25 ते 30 कोटी रुपये खर्च होणार आहे. विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, अरविंद शिंदे, वसंत मोरे, अविनाश बागवे, विशाल तांबे यांचीही यावेळी भाषणे झाली.त्यांनीही याप्रकरणी पालिकेच्या हिताचा विचार करून हा प्रस्ताव मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली, तशी उपसूचना ही दिली.

यावर स्पष्टीकरण देताना बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता युवराज देशमुख म्हणाले, की डीपी तील पुलाचे काम भूसंपादन अडचणीमुळे लवकर काम सुरू होऊ शकत नाही. त्यातुलनेत 205 खाली आखलेल्या पुलाचे काम लवकर होऊ शकते. या कामासाठी 40 कोटी रुपये खर्च येणार आहे. जाधव यांनी दिलेली उपसूचना 23 विरुद्ध 70 फेटाळली आणि भाजपने बहुमताच्या जोरावर प्रस्ताव बहुमताने मंजूरही केला.