सलग तिसर्‍यावर्षी मार्च अखेर कोट्यवधीचे व्यायाम साहित्य खरेदीचा ‘घाट’ ! आतापर्यंतचे ऑडीट नाही, आरोग्याच्या नावाखाली महापालिकेत ‘लुट’ ?

पुणे ( शिवाजीनग ) : पोलीसनामा ऑनलाइन –  महापालिकेने ऐन उन्हाळ्यात व्यायामाचे साहित्य खरेदी करण्याची परंपरा सलग तिसर्‍या वर्षी पाळली आहे. शहरातील विविध व्यायामशाळांसाठी व्यायाम साहित्य खरेदीच्या नावाखाली मार्च एन्डला कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढणार्‍या महापालिकेेने यंदाही तब्बल ४ कोटी ५५ लाख रुपयांचे व्यायाम साहित्य तसेच ओपन जीमसाठी ८० लाख रुपयांचे साहित्य खरेदीच्या निविदा काढल्या आहेत. मागील दोन वर्षात साधारण याच सुमारास तब्बल १० कोटी रुपयांचे खरेदी केलेले साहित्य कुठे वापरले गेलेय याचा एकत्रित लेखाजोखाच कुठेच उपलब्ध नसल्याने व्यायामाच्या साहित्याची कोट्यवधी रुपयांची खरेदी चर्चेत आली आहे.

महापालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या व भाडेकराराने चालविण्यास देण्यात आलेल्या सुमारे ५० व्यायाम शाळा शहरात आहेत. यापैकी काही व्यायामशाळा चालकाविना पडून आहेत. बरेतर या व्यायामशाळा सुरू करताना त्यामध्ये व्यायाम साहित्य बसविण्यात आले आहे. वापरामुळे खराब होणारे साहित्य बदलण्याची अथवा दुरूस्त करण्याची जबाबदारी ही संबधित चालकावर सोपविण्यात आली आहे. परंतू यानंतरही महापालिकेच्या भांडार विभागाच्यावतीने मागील तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर व्यायामसाहित्य खरेदी करण्यात येत आहे. मागील दोन वर्षात साधारणपणे दहा कोटी रुपयांचे साहित्य खरेदी करण्यात आले असून यंदाही साडेचार कोटी रुपये किंमतीचे साहित्य खरेदीची निविदा अंतिम मान्यतेच्या प्रतिक्षेत आहे.

नगरसेवकांकडून क्षेत्रिय कार्यालयांच्या माध्यमातून नोंदविण्यात येणार्‍या मागणीनुसार व्यायाम साहित्य खरेदी करण्यात येते. भांडार विभाग फक्त खरेदीची प्रक्रिया राबवून साहित्य संबधित क्षेत्रिय कार्यालयाकडे स्वाधीन करते व नोंद घेते. पुढे जाउन क्षेत्रिय कार्यालयामार्फत हे साहित्य नगरसेवकांच्या मागणीच्या ठिकाणी पोहोचवण्यात येते. वास्तविकत: व्यायामाचे साहित्य जागेवर बसवण्याची जबाबदारी ही संबधित ठेकेदाराची असते. हे साहित्य ज्याठिकाणी बसविले आहे, त्याचे फोटोग्राफ्सही बिलासोबत जोडून भांडार विभागाकडे देण्याची जबाबदारी ठेकेदाराची असते. परंतू प्रत्यक्षात केवळ स्वाक्षरी केेलेले डिलीव्हरी चलनच बिलासोबत जोडले असल्याचे भांडार विभागाकडील फाईल तपासणीनंतर दिसून येते. दक्षता विभागानेही यापुर्वी बसविण्यात आलेल्या व्यायाम साहित्याचे ऑडीट करण्याबाबत सुचित केले आहे. मात्र, त्यावर भांडार विभागाने ही जबाबदारी संबधित क्षेत्रिय कार्यालयांची असल्याचा शेरा मारून दक्षता विभागाने काढलेल्या त्रुटींना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

यासोबतच स्थानीक स्वराज्य संस्थांनी डीएसआर रेट नसलेल्या वस्तुंची खरेदी शासनाच्या जेईएम पोर्टलवरून खरेदी करावेत, असे बंधन घातलेले आहे. साधारण तीन वर्षांपासून जेईएम पोर्टलवरील खरेदीस सुरूवात झाली आहे. निविदांमध्ये राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होवून निविदेत पारदर्शकता राहील हा या जेईएम पोर्टल निर्मितीचा हेतू आहे.

परंतू व्यायामाचे साहित्य व अन्य काही वस्तुंचा पुरवठा करणार्‍या विक्रेत्यांनी जेईएम पोर्टलवर नोंदणी केली नसल्याने यापुर्वी वापरण्यात येणार्‍या एबीसी प्रोक्युअर या महापालिकेच्यावतीने वापरण्यात येणार्‍या वेब पोर्टलवर जाहिरात देउन निविदा मागविण्यात आल्या होत्या. विशेष असे की, जेईएम पोर्टलवर ज्या वस्तुंच्या विक्रेत्यांची माहिती नसेल, त्याबाबत या पोर्टलला कळविल्यास संबधित वस्तु विक्रेत्यांची नावे घेता येतात.

परंतू भांडार विभागाने मागील तीन वर्षांत एकदाही जेईएम पोर्टलशी पत्रव्यवहार केला नसल्याची माहिती पालिकेतील अधिकारी सूत्रांनीच दिली आहे. यामुळे व्यायामाचे साहित्य असो अथवा अन्य काही वस्तूंच्या निविदा या जेईएम ऐवजी मागीलवर्षी एबीसी प्रॉक्युअर व यावर्षी महाटेंडर या वेबसाईटवरून मागविण्यात आल्या आहेत. यामुळे निविदेमध्ये रिंग करणे सोपे झाले असून ठराविक ठेकेदारांनाच डोळ्यासमोर ठेवून निविदा निघू लागल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

क्षेत्रिय कार्यालय व उपायुक्त कार्यालयांकडून होणार्‍या मागणी नुसार भांडार विभाग केवळ खरेदीची प्रक्रिया राबवतो. भांंडार विभागाच्यावतीने खरेदी करण्यात आलेल्या वस्तू या संबधित क्षेत्रिय कार्यालयांच्या ताब्यात देण्यात येतात व त्याची पोहोच घेण्यात येते. या वस्तूंच्या नोंदी ठेवण्याची जबाबदारी ही सर्वत: संबधित क्षेत्रिय कार्यालयांची आहे. – सुनिल इंदलकर, उपायुक्त, भांडार विभाग