Pune PMC News | महापालिकेला सुमारे 70 टक्के निकृष्ठ राष्ट्रध्वजांचा पुरवठा ! सूरत आणि नागपूर येथील राष्ट्रध्वज उत्पादकांवर कारवाईची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | ‘हर घर तिरंगा’ योजनेअंतर्गत महापालिकेला राज्य शासन आणि सीएसआर मधून प्राप्त झालेले सुमारे ७० टक्के राष्ट्रध्वज हे मानकाप्रमाणे नसल्याने शहराच्या विविध भागातील नागरिकांकडून तीव्र नापसंती व्यक्त करत रोषही व्यक्त करण्यात येत आहे. अगदी अल्पकालावधीत या ध्वजांची रात्रंदिवस तपासणी करून ते घरोघरी पोहोचवण्यामध्ये महापालिकेच्या कर्मचार्‍यांची चांगलीच दमछाक झाल्याचे पाहायला मिळत आहे. बहुतांश पुरवठादारांनी हे ध्वज गुजरातमधील सूरत आणि काही नागपूर येथील उत्पादकांकडून मागविले आहेत. संबधित उत्पादकांवर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. (Pune PMC News)

 

देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्याचे जाहीर केले आहे. विविध संघटना, राजकिय पक्ष आणि स्वंयसेवी संस्थांसोबतच सर्वच राज्ये आणि स्थानीक स्वराज्य संस्थांनी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पुणे महापालिकेनेही नागरिकांसाठी मोफत राष्ट्रध्वज पुरविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महापालिकेने १५ क्षेत्रिय कार्यालयांना सुमारे ६ लाख ७५ हजार, सामान्य प्रशासन व इतर विभागांना २० हजार ९०० आणि पुणे विद्यापीठाला ९७ हजार ५०० ध्वज उपलब्ध करुन दिले आहेत. (Pune PMC News)

परंतू यापैकी केवळ ३० ते ३३ टक्के ध्वज हे मानकाप्रमाणे आहेत. उर्वरीत ध्वजांची साईज, तीनही रंगांचे आकारमान एकसारखे नसणे, ध्वज काठीत घालण्यासाठीची उलट सुलट शिलाई, अशोक चक्र मध्यभागी नसणे, सुमार दर्जाचे कापड, त्यावर रंगीत डाग असे प्रकार आढळून आल्याने शहराच्या विविध भागातील नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केल्याने अधिकारी व कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. कोथरूड येथे राहाणारे प्रशांत भोलागिर यांनी त्यांच्या घरी नेउन देण्यात आलेला असा चुकीचा ध्वज महापालिकेच्या अधिकार्‍यांना परत नेउन दिला. गोखलेनगर येथील सचिन बहिरट आणि बाबा सय्यद यांनीही अशोक चक्र मध्यभागी नसलेला ध्वज परत केला असून महापालिकेने असे ध्वजांचे वाटप रोखावे अशी मागणी केली आहे. तसेच महर्षिनगर येथे राहाणार्‍या भारत सुराणा व त्यांच्या सहकार्‍यांनी महापालिका अधिकार्‍यांच्या कार्यालयात ध्वज परत करत ध्वजांचा अवमान करणार्‍या ध्वज उत्पादकांवर गुन्हे दाखल करावे अन्यथा आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

 

महापालिकेने बहुतांश राष्ट्रध्वज सीएसआर अंतर्गत मागविले आहेत.
राज्य शासनानेही महापालिकेला अडीच लाख ध्वज दिले होते.
परंतू ते सर्वच खराब असल्याने पुन्हा परत पाठविण्यात आले आहेत.
महापालिकेला ज्या पुरवठादारांनी ध्वज पुरविले आहेत, त्यांचे सूरत आणि नागपूर येथे उत्पादन झालेले आहे.
महापालिकेने सुमारे ११ लाख ९४ हजार राष्ट्रध्वज मागविले होते.
त्यापैकी सुमारे ७० टक्के ध्वज हे खराब निघाले आहेत.
मानकाप्रमाणे सुस्थितीत असलेले ध्वज वाटप करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
यानंतरही नजरचुकीने मानकाप्रमाणे नसलेले ध्वज मिळाले असतील तर ते नागरिकांनी परत करावेत, अशी आमची विनंती आहे.

– आशा राउत, उपायुक्त, भांडार विभाग, पुणे महापालिका. (Asha Raut PMC)

 

Web Title :- Pune PMC News | About 70 percent inferior national flags supply to the municipal corporation! Demand action against national flag manufacturers in Surat and Nagpur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा