Pune PMC News | शहरी गरिब योजनेतील लाभार्थींना लवकरच ‘डिजिटल कार्ड’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | सर्व सामान्य पुणेकरांसाठी वरदान ठरलेल्या शहरी गरीब योजना अधिक गतिमान होण्यासाठी महापालिका प्रशासनाने ‘डिजिटायजेशन’ चा मार्ग निवडला आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना डिजिटल कार्ड देण्यात येणार असून हॉस्पीटलची बिलेही ऑनलाईन मागवून पेमेंटही ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहे. यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या काही दिवसांत प्रत्यक्षात अंमलबजावणी देखिल सुरू होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. (Pune PMC News)

 

पुणे महापालिकेच्यावतीने १२ वर्षांपुर्वी शहरी गरीब योजना सुरू करण्यात आली आहे. एक लाख रुपये आर्थिक उत्पन्न असलेल्या पुणेकर नागरिकांना उपचारांसाठी एक लाख रुपये आणि कॅन्सर रुग्णांसाठी दोन लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येते. यासाठी शहरातील ७० हून अधिक रुग्णालये निश्‍चित करण्यात आली असून त्याठिकाणी नागरिकांना उपचारासाठी आर्थिक मदत देण्यात येते. आतापर्यंत या योजनांचा लाखो पुणेकरांना लाभ झाला असून कोरोना काळात सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांसाठी ही योजना वरदान ठरली आहे. (Pune PMC News)

 

योजनेची व्याप्ती वाढत असताना शहरी गरीब कार्ड योजनेचे कार्डचे ड्युप्लीकेशन होणे, एकाच आजारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात वेगवेगळे चार्जेस आकारणी, रुग्णालयांकडून महापालिकेकडे बिले आल्यानंतर त्याची तपासणी व रुग्णालयांचे पेमेंट करण्यात होणारा विलंब, कार्ड काढण्यासाठी महापालिका भवनातील मुख्य कार्यालयात होणारी गर्दी या सर्वांचा विचार करून या योजनेत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी अधुनिक डिजिटायजेशन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती विक्रम कुमार आणि अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी दिली.

यासाठी प्रत्येक शहरी गरीब योजनेच्या कार्ड धारकाला डिजिटल कार्ड देण्यात येणार आहे. त्यांच्या आधारकार्डशी हे कार्ड जोडण्यात येणार असल्याने ड्युप्लिकेशन टळणार आहे. यासाठीच्या सॉफ्टवेअरमध्ये रुग्णांचा डाटाबेस तयार होणार आहे. तसेच विविध रुग्णालयांकडून एकाच आजारासाठी आकारणी करण्यात येणार्‍या बिलांवरही सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. कार्ड काढण्यासाठी महापालिका भवन येथे होणारी गर्दी कमी करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रिय कार्यालय स्तरावर हे कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच या योजनेतील रुग्णालयांना लॉगीन आयडी देण्यात येणार असून त्यांना डिजिटल स्वरूपात महापालिकेला बिल पाठविता येणार आहे, तसेच महापालिकेलाही त्यांचे पेमेंट ऑनलाईन स्वरुपात करता येणार आहे. यामुळे अनावश्यक विलंब टळणार असून नागरिकांच्या वेळेतही बचत होण्यास मदत होईल, असा दावा विक्रम कुमार यांनी केला आहे.

 

नगरसेवक व महापालिका सेवकांनाही ‘डिजिटल’ कार्ड देणार

महापालिका सेवक आणि नगरसेवकांच्या उपचारांचा खर्च महापालिकेच्यावतीने करण्यात येतो.
यामध्येही महापालिकेकडे बिले सादर केल्यानंतर महापालिका संबधित रुग्णालयांची बिल देते.
नगरसेवक आणि महापालिका सेवकांच्या उपचारासाठी ‘इन्शुरन्स’ कंपनीची मदत घेण्यात येणार आहे.
यासाठी तज्ज्ञ सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत नगरसेवक व सेवकांना स्वतंत्र डिजिटल आरोग्य कार्ड देण्यात येणार आहे.
या कार्डचा वापर करून त्यांना कुठल्याही अडथळ्यांशिवाय रुग्णालयांमध्ये उपचार घेणे सोयीस्कर होईल, असा आमचा प्रयत्न आहे.

विक्रम कुमार, महापालिका आयुक्त व प्रशासक, पुणे महापालिका

 

 

Web Title : –  Pune PMC News | Digital card for the beneficiaries of urban poor scheme soon

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा