शहरात तीन महिन्यांत विविध शासकिय जागांवर केले वृक्षारोपण
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune PMC News | गणेशखिंड रस्ता रुंदीकरणासाठी काढाव्या लागलेल्या १७८ झाडांच्या बदल्यात महापालिकेने शहरात विविध ठिकाणी शासकिय जागांवर तब्बल पाच हजार १३ झाडे लावण्यात आली आहेत. गणेशखिंड रस्त्यावरील झाडे काढण्यास विरोध करणार्या याचिकेवर महापालिकेने उच्च न्यायालयात १७८ झाडे काढण्याच्या बदल्यात पाच हजार झाडे लावण्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते, त्यानुसार ही झाडे लावण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या पथविभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाच्या कामामुळे गणेशखिंड रस्ता रुंदीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या रस्ता रुंदीकरणासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेली १७८ झाडे काढावी लागणार होती. पर्यावरण प्रेमींनी ही झाडे काढण्यास विरोध करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने काही अटींवरच महापालिकेला ही झाडे काढण्यास परवानगी दिली होती. महापालिकेने झाडे काढण्याच्या बदल्यात नवीन झाडे लावणे तसेच काही झाडांचे त्याच रस्त्यांच्याकडेला पुर्नरोपण करण्यात येईल, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयाला दिले होते.
महापालिका प्रशासनाने पाषाण पंचवटी येथे ८५८, गणेशखिंड रस्त्याच्या पदपथावर १७५, औंध येथील पशु संवर्धन केंद्रात १ हजार ८८९, ऍनिमल रिसर्चच्या आवारात ४४७, अंडी उबवणूक केंद्राच्या आवारात १ हजार २९०, काउ रिसर्च सेंटरच्या आवारात ३५६ झाडे लावली आहेत. तर परवानगी घेतलेल्या ७१ पैकी ४१ झाडांचे पुर्नरोपणही करण्यात आले असून ३० झाडे काढण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. पदपथांवर लावण्यात आलेल्या झाडांना संरक्षक जाळ्या देखिल लावण्यात आल्या आहेत. नव्याने वृक्षारोपण करण्यात आलेली सर्व झाडे ही कडुलिंब, शिसम, अर्जून, आवळा, वड, पिंपळ, सोनचाफा यासारख्या देशी प्रजातींची आहेत, अशी माहिती अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.