Pune : ‘ऍमेनिटी स्पेस’ची ‘विक्री’ न्हवे ‘लिज’वर देण्याचा निर्णय महापालिकेच्या विचाराधीन !

पुणे – ऍमेनिटी स्पेस म्हणून ताब्यात आलेल्या जागा ३० वर्ष लिजवर देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून तयार करण्यात येत आहे. सुमारे २५ हेक्टर क्षेत्रावर नागरी सुविधा उभारण्याचेच बंधन राहणार असून संबंधित सोसायट्यांना यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. यामुळे ऍमेनिटी स्पेचवर संबंधित परिसराची गरज पाहूनच नागरी सुविधांना प्राधान्य मिळणार आहेच, त्याचवेळी या जागांचे अतिक्रमणापासून संरक्षण आणि पालिकेला चांगले आर्थिक उत्पन्नही मिळणार आहे, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

महापालिकेच्या विकास नियमावली नुसार २० ते ४० हजार चौ. मी. क्षेत्राचे विकसन करताना १५ टक्के जागा ऍमेनिटी म्हणून पालिकेच्या ताब्यात घेण्यात येते. या ठिकाणी शाळा, दवाखाने, खेळाचे मैदान, स्विमिंग टँक, अग्निशामक केंद्र, उद्यान, ओटा मार्केट, व्यायामशाळा , सांस्कृतिक हॉल या सारख्या नागरी सुविधा उभारण्यात येतात. महापालिका प्रशासन अथवा स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सूचनांनुसार या सुविधा पालिका स्वखर्चातून उभारते. परंतु या सुविधा उभारल्यानंतर त्या चालवणे अथवा त्याची देखभाल दुरुस्ती करणे हे काम पालिकेला जमत नसल्याचे अनेकदा पाहायला मिळत आहे.

अफेनिटी स्पेस वर उभारलेल्या बहुतांश सुविधा ठेकेदारी पद्धतीने चालवायला दिल्या जातात. बरेचदा परिसराची गरज , रेडिरेकनरच्या दरानुसार केली जाणारी भाडे आकारणी यासारख्या व्यावसायिक बाबींचा मारसा विचार होत नसल्याने अफेनिटी स्पेसवर उभारलेल्या सुविधा महापालिकेसाठी पांढरा हत्ती ठरत आहेत. तर काही ठिकाणी वर्षानुवर्षे रिकाम्या असलेल्या या जागांवर अतिक्रमण होत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.

यापार्श्वभूफीवर ऍमेनिटी स्पेसच्या जागां अतिक्रमण मुक्त ठेवण्यासाठी तसेच त्याठिकाणी स्थानिक गरजेनुसार नागरी सुविधा उपलब्ध करून देतानाच महापालिकेला उत्पन्न मिळावे या हेतूने महापालिकेचे जवळपास मागील पावणे दोन वर्ष प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये या जागा नागरीसुविधा पुरवण्याच्या हेतूने विकणे अथवा त्या दीर्घकाळ लिजवर देणे हे दोन पर्याय समोर आले आहेत. यापैकी जागा विकण्याला मोठ्या प्रफाणात विरोध होत आहे. काहींनी तर या विरोधात महापालिकेला नोटीस ही बजावली आहे. यामुळे पालिका प्रशासनाने ऍमेनिटी स्पेसच्या जागा ३० वर्ष लीज ने देण्याचा विचार सुरू केला आहे. हे करत असताना लिजची मुदत संपल्यानंतर संबंधित संस्थेला लीज ची मुदतवाढ देण्यात प्राधान्यक्रमाचा विचार केला आहे.

ऍमेनिटी स्पेस चे वाटप करताना ज्या सोयायटीने ही ऍमेनिटी स्पेस पालिकेला हस्तांतरित केली आहे त्याच सोसायटीला प्राधान्य दिले जाणार आहे. ऍमेनिटी स्पेसवर नागरीसुविधांसाठी विकसन करताना बांधकाम विभागाची एनओसी घेणे संबंधिताला बंधनकारक राहणार आहे. लवकरच यासंदर्भतील प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महापालिकेला आतापर्यंत सुमारे १०० हेक्टर जागा ऍमेनिटी स्पेस म्हणून ताब्यात मिळाली आहे. यापैकी बहुतांश जागांवर आरक्षणानुसार तसेच प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी च्या सूचनांनुसार विकास करण्यात आला आहे. यानंतर तब्बल २५ हेक्टर क्षेत्र असलेल्या सुफारे ११७ अफेनिटी स्पेसचे प्लॉटस शहराच्या विविध भागात आहेत.

हा होणार फायदा

ऍमेनिटी स्पेसच्या जागा लिजवर दिल्यातरी जागेची मालकी पालिकेकडे राहाणार आहे. खासगी विकसकाकडून व्यावसायिक दृष्ट्या परिसराची गरज ओळखून नागरी सुविधा उपलब्ध होणार आहेत. या जागा अतिक्रमित होण्यापासून वाचणार आहेत. लिजवर घेणार्‍याकडून जागेवर सुविधा आणि मेंटेनन्स केला जाणार असल्याने पालिकेचा सुविधा निर्माण करण्यावरचा खर्च वाचणार आहे. तसेच यातून पालिकेला उत्पन्नाचा नवीन मार्ग निर्माण होणार आहे.

ऍमेनिटी स्पेसवर काय उभारता येणार ?

ऍमेनिटी स्पेसवर दवाखाना, शाळा, क्रिडा संकुल, क्लब हाऊस, सांस्कृतिक हॉल, मंडई, उद्यान यासारख्या नागरीसुविधा उभारता येणार आहेत.