कचरा गोळा करण्यासाठी लागणार्‍या ढकलगाड्यांच्या ‘अवाच्या सव्वा’ खरेदीला ‘ब्रेक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कचर्‍याच्या बकेट, कापडी पिशव्या, लोखंडी बेचेंस आणि कचरा गोळा करण्यासाठी लागणार्‍या ढकलगाड्यांच्या अवाच्या सव्वा खरेदीला अखेर पक्षनेत्यांनीच ब्रेक लावला आहे. कुठल्याही सदस्याला त्यांना मिळणार्‍या निधीतून वरिल चारही वस्तू खरेदीसाठी दहा लाख रुपये निधी खर्च करण्याचे बंधन घालण्याचा निर्णय आज पक्षनेत्यांच्या बैठकीमध्ये घेण्यात आल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, की नगरसेवक घरोघरी कचरा विलगीकरणासाठी नागरिकांना प्लास्टिकच्या बकेट देतात. तसेच कचरा गोळा करण्यासाठी लोखंडी ढकलगाड्याही कर्मचार्‍यांना पुरविण्यात येतात. यासोबतच ज्येष्ठ नागरिक आणि नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी बसण्यासाठी लोखंडी बेचेंस पुरविण्यात येतात. तर प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर कमी व्हावा यासाठी नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप होते. परंतू मागील काही वर्षामध्ये बकेट, कापडी पिशव्या, लोखंडी बेचेंस असो याच्या खरेदीसाठी नगरसेवकांचे सातत्याने प्रस्ताव येउ लागले आहेत. या खरेदीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे आरोपही सर्वसाधारण सभेत झाले आहेत. एवढेच नव्हे तर नागरिकांकडूनही याबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत.

बकेटचा वापर कचर्‍या ऐवजी पाणी भरून ठेवण्यासाठी अथवा रोपे लावण्यासाठी कुंडीसारखा होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. तसेच बेचेंसही खाजगी जागांमध्ये बसविले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. तर अनेक ठिकाणी बसविलेले लोखंडी बेचेंस गायबही झालेले आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून वरिल चारही वस्तु खरेदींवर निबर्र्ध आणण्यासाठी आज झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीमध्ये वरिल चारही वस्तू खरेदीसाठी केवळ १० लाख रुपयांपर्यंत निधी खर्च करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच एखाद्या नगरसेवकाने एकाचवेळी १० लाख रुपयांच्या बकेट खरेदी केल्यास पुढील चार वर्षे त्याला बकेटसाठी निधी देण्यात येउ नये. नगरसेवकांनीही यादीमध्ये या वस्तूंच्या खरेदीसाठी निधीची मागणी करू नये, असेही आवाहन नगरसेवकांना करण्यात आल्याचे टिळक यांनी नमूद केले. या बैठकीला विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, अतिरिक्त आयुक्त बिपीन शर्मा व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

नागरिक, विविध संस्था व संघटनांकडून महापालिकेला भेट देण्यात येणार्‍या महापुरूषांच्या प्रतिमा, तैलचित्रांबद्दलही पक्षनेत्यांच्या बैठकीमध्ये धोरण तयार करण्यात आले आहे. हे तैलचित्र अथवा प्रतिमा शासनाच्या धोरणाप्रमाणेच ३ बाय २ फूटांचे असावे. ते कोठे लावावे याचे सर्व अधिकार महापालिका प्रशासनाला राहातील, असा करार ते भेट देणार्‍यासोबत करणे बंधनकारक करण्यात आल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.