Pune : गणेशमूर्ती विक्रेते आणि ग्राहकांवर ‘सुलतानी’ संकट, महापालिकेच्या ‘या’ धोरणामुळं मूर्तींच्या किंमती वाढणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे मागीलवर्षी लांबलेला पाउस, पाठोपाठ कोरोना महामारीची साथ यामुळे अनेक व्यवसायांसोबतच गणेश मुर्तीकार आणि विक्रेत्यांनाही फटका बसला आहे. ही नैसर्गिक संकटे पाठ सोडत नसताना आता महापालिका प्रशासनाने विक्रेत्यांवर ‘सुलतानी’ संकटाची टांगती तलवार लटकवल्याचे समोर येत आहे. कोरोनाच्या संकटकाळात गर्दी टाळण्यासाठी मुर्ती विक्रेत्यांना रस्त्याच्या ऐवजी मोकळ्या मैदानांवर अथवा शाळांच्या आवारात स्टॉल देण्याचा निर्णय घेतल्याने मुर्ती विक्रेत्यांना भाडेदराचा मोठा भुर्दंड भरावा लागणार असल्याने व्यावसायीकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर २२ आणि २४ जुलै रोजी पक्षनेते, पोलिस आणि प्रशासकिय अधिकार्‍यांसोबत बैठका झाल्या. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गणेशोत्सव साधेपणाने साजरे करण्याचा निर्णय घेतानाच गर्दी टाळण्यासाठी काही सूचनाही करण्यात आल्या आहेत. यामध्ये अगदी गणेशमूर्ती विक्री करणार्‍या स्टॉलबाबतही निर्णय घेण्यात आला. गणेशमूर्ती विक्री करण्यासाठी ऑनलाईन डिलिव्हरी करण्यास प्राधान्य देण्यात यावे. आगमनाच्या ५ ते १० दिवस अगोदर नागरिकांनी गणेशमूर्ती घरी घेउन जावे याबाबत जनजागृती करण्यात यावी. रस्ता, पदपथांवर स्टॉल उभारण्यास परवानगी देण्यात येउ नये. अनधिकृत स्टॉल उभे राहाणार नाहीत, याची क्षेत्रिय कार्यालयांनी दक्षता घ्यावी. कन्टेन्मेंट झोन व कन्टन्मेंट झोन बाहेर गणेशमूर्ती स्टॉलसाठी जवळपासच्या शाळेची दोन-तीन मैदाने उपलब्ध करून द्यावीत, असे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या बैठकीमध्ये दिले आहेत.

दरम्यान, गेली अनेकवर्ष सिझनल व्यवसाय असलेल्या गणेशमूर्ती विक्रेत्यांना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने कुंभारवाडा, श्रमिक भवन रस्ता, सारसबाग तसेच काही ठिकाणी ऍमेनिटी स्पेसमध्ये स्टॉल साठी परवानगी देण्यात येते. साधारण एक ते दीड हजार विक्रेते परवानगी घेतात. तर बिगर परवानगीनेही अनेक ठिकाणी मूर्ती विक्री होते. महापौर मोहोळ यांच्या निर्णयानुसार शाळा अथवा मैदाने स्टॉलसाठी बंधनकारक केल्यास मालमत्ता विभागाच्यावतीने त्याचे रेडीरेकनर दरानुसार भाडे आकारले जाणार आहे. हा भाडेदर आणि डिपॉझीटच्या रकमेसोबतच विजेसाठीचा वाढणारा खर्च विक्रेत्यांच्या आणि पर्यायाने ग्राहकांवर पडणार आहे.

मूर्ती विक्रेते आणि ग्राहकांवर पडणार बोजा -पुणे शहर गणपती मूर्तीकार संघटना
गणेश मूर्तीकार वर्षभर मूर्ती तयार करतात. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने मागील ५० वर्षांपासून मूर्ती विक्रीसाठी गणेश आगमनापुर्वी २ ते ३ दिवस अगोदर परवानगी दिली जाते. साधारण ८ बाय ८ च्या मंडपासाठी ३ हजार रुपये डिपॉझीट आणि दरदिवशी दीड हजार रुपये भाडे आकारले जाते. मागील काही वर्षांपासून महापालिका भवन मागील श्रमिक भवनजवळील रस्त्यावर साधारण १५० स्टॉलसाठी परवानगी देण्यात येते. एकाच ठिकाणी विजेची व्यवस्था करणेही संघटनेला सुकर ठरते. प्रशासनाच्या नवीन आदेशानुसार खाजगी अथवा महापालिकेच्या जागेत ५ ते १० दिवस अगोदर स्टॉल उभारायचे झाल्यास रेडीरेकनरनुसार अधिकचे भाडे द्यावे लागणार आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र विज व्यवस्थेचा खर्च वाढणार आहे. भांडवली खर्च वाढल्यास त्याचा परिणाम मूर्तीच्या किंमती वाढणार असून त्याचा झटका विक्रेत्यांसोबतच ग्राहकांनाही बसणार आहे.

हे विघ्न टाळण्यासाठी पालिकेने मूर्ती विक्रेत्यांना अतिक्रमण विभागाच्यावतीने रस्त्याच्या कडेला आणि पदपथांवर मूर्तीचे स्टॉल्स उभारण्यासाठी परवानगी द्यावी. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कमीत कमी गर्दी होईल, स्वच्छता आणि फीजिकल डिस्टसिंगसोबतच सुरक्षिततेचे उपाय आम्ही निश्‍चितपणे करू, अशी मागणी पुणे शहर गणपती मूर्तीकार संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर चांदेकर, उपाध्यक्ष रफिक अख्तार आणि सागर शिंदे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like