Pune : पीएमपी सेवकांकडून बसथांब्याची स्वच्छता मोहीम – आगारप्रमुख सोमनाथ वाघुले

पुणे : कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागिल दोन महिन्यांपासून पीएमपीएमएलच्या बसेस बंद आहेत. पीएमपी बसस्थानक आणि बसथांब्यावर अनेक कंपन्यांनी स्वतःची फुकटात जाहिरात करण्यासाठी कागद चिकटवल्याने ओंगळ स्वरूप प्राप्त झाले आहे. मागिल दोन दिवसांपासून पीएमपी सेवकांकडून बसस्थानक आणि थांब्यावर चिकटवलेले कागद काढून स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे. जाहिरात करणाऱ्या कंपन्यांनी आता पीएमपी बसस्थानक वा बसथांब्यावर अनधिकृत जाहिराती चिकटवू नयेत, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे शेवाळेवाडी आणि भेकरीनगर पीएमपी आगारप्रमुख सोमनाथ वाघुले यांनी सांगितले.

वाघुले म्हणाले की, शेवाळेवाडी-भेकराईनगर आगार ते पुलगेट दरम्यान स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. पीएमपीच्या सेवकांनीही स्वतःच या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला आहे. आठ-दहा सेवकांचे चार गट तयार केले आहे. पहिल्या सत्रामध्ये दोन आणि दुपारच्या सत्रामध्ये दोन गट काम करीत आहेत. नागरिकांकडूनही त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे. आता बसथांब्यावर कोणी अनधिकृत जाहिराती चिकटविण्याचा प्रयत्न केला, तर त्याला अटकाव केला जाईल. कोणी जाहिरात चिकटविताना दिसला तर त्याला पकडून त्यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रशांत सुरसे म्हणाले की, पीएमपी सेवकांकडून बसथांब्याची स्वच्छता केली जात आहे, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. आता या ठिकाणी कोणी अनधिकृत जाहिराती चिकटवल्या तर त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी फक्त पीएमपी प्रशासनाची नाही, तर समाजाची आहे. जाहिरात चिकटविताना कोणी दिसला तर नागरिकांनीही त्याला विरोध केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.