Pune : PMPML बंदचा प्रवाशांबरोबर रिक्षाचालकांनाही फटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासनाने आजपासून (शनिवार, दि. ३ एप्रिल) शहरातील पीएमपी बससेवा बंद केली. त्यामुळे पुणे स्टेशन आणि एसटी स्थानकात शुकशुकाट होता. बस बंदचा फायदा घेत रिक्षाचालकांनी प्रवाशांची अडवणूक केली. त्यातून त्यांची चंगळ झाली असली तरी, अनेक रिक्षाचालकांना दररोजच्याएवढीही बिदागी मिळाली नाही त्यामुळे त्यांच्यासाठी आजचा दिवस मंगळ ठरल्याची चर्चा रिक्षाचालकांमध्ये सुरू होती. शनिवार-रविवार शासकीय कार्यालयांना सुटी आणि कडक निर्बंधामुळे अनेक कंपन्यांनीही कामगारांना सुटी दिल्याने नागरिक घराबाहेर पडले नाहीत. उपनगर आणि परिसरातून रेल्वे स्टेशन आणि एसटी स्टँडवर जाणाऱ्या नागरिकांकडून काही रिक्षाचालकांनी दामदुप्पट पैसे घेतले. मात्र, पुणे स्टेशन आणि एसटी स्टँड परिसरात रिक्षाचालक कडक उन्हामध्ये कोणी भाडे देता का भाडे, असे सांगत प्रवाशांना अक्षरशः विनवणी करताना दिसत होते. पीएमपी बससेवा बंदचा फटका प्रवाशांबरोबर रिक्षाचालकांनाही बसला.

कोरोनाचे सावट दिवसेंदिवस गडद होत असल्याने कामगारवर्गही धास्तावला आहे. परराज्यातील कामगारांनी पुन्हा थेट गाव गाठण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांना आज रिक्षाचालकांच्या अरेरावीला सामोरे जावे लागले. हडपसर, बाणेर, औंध, येरवडा, कोंढवा, कात्रज आदी परिसरातील काही रिक्षाचालकांनी भल्या सकाळी कामावर आणि बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांकडून दामदुप्पट पैसे घेतले, ही वस्तुस्थिती होती. मात्र, उद्योग, व्यवसाय आणि कंपन्यांमध्येही कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने अनेकांनी घरातच थांबणे पसंत केले होते. उन्हाचा कडाका असल्याने खरेदीदारही घराबाहेर पडला नाही. पीएमपी बससेवा बंद असल्याने अनेकांनी स्वतःचे वाहन वापरणे, तर काहींनी सुटी घेणे पसंत केले. बाहेरगावाहून एसटी बस वा रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची संख्याही तुलनेने कमी होती. त्यातच बससेवा बंद असल्याने अनेकांचे नातेवाईक बसथांब्यावर येऊन थांबल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पीएमपी बस बंद असूनही नेहमीपेक्षा कमी धंदा झाल्याचे जिल्हाधिकारी कार्यालय, ससून रुग्णालय, एसटी स्थानक आणि रेल्वे स्टेशनजवळील रिक्षाचालकांनी सांगितले. या परिसरातील सर्वच रिक्षाचालक शेअर पद्धतीने प्रवाशांना विनवणी करीत होते.

बससेवाच बंद केल्याने सर्वसामान्य आणि मध्यवर्गीयांना तुलनेने वाहतूक व्यवस्था नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. दुसरीकडे सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत रिक्षासेवा सुरू राहणार असल्याने त्यांच्याकडून प्रवासी वर्गाची अडवणूक केली जात आहे. सायंकाळी सहानंतर व्यवसाय बंद राहणार असल्याने रिक्षाचालकांच्याही आमदानीवर परिणाम होणार आहे. सायंकाळी सहानंतर कोणतीच वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना खासगी वाहने किंवा पायपीट करावी लागणार आहे, हे सांगण्यासाठी कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही.

हडपसरमधील रिक्षाचालकांनी सांगितले की, लॉकडाऊनपूर्वी एक हजार रुपयांच्या आसपास व्यवसाय होत होता. मात्र, लॉकडाऊननंतर आता कुठे चार-पाचशे रुपये धंदा होऊ लागला होता. त्यातही आजपासून पुन्हा कडक निर्बंध केल्यामुळे आज सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत फक्त दोनशे रुपये मिळाले. नागरिक घराबाहेर पडले नाहीत. शनिवार-रविवार शासकीय कर्मचाऱ्यांना सुटी असते, जिल्हाधिकारी कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातून शासकीय कर्मचारीवर्ग मोठ्या प्रमाणात प्रवासी आहेत. आज पीएमपी बससेवा बंद असल्याने प्रवासी मिळाले नाहीत. भल्या सकाळपासून दुपारपर्यंत फक्त ७०-८० रुपये मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

बाणेर येथून अनिल चौधरी हे रिक्षाने पुणे स्टेशनला आले होते. ते म्हणाले की, आज पीएमपी बससेवा बंद असल्यामुळे रिक्षाचालकाने सुरुवातीला अडीचशे रुपये मागितले. मात्र, तडजोड केल्यानंतर त्याने शेअर पद्धतीने १८० रुपयांमध्ये स्टेशनपर्यंत आणले. त्यातही रिक्षाचालकाने तिघांकडून १८० प्रमाणे पैसे घेतल्याचे इतर प्रवाशांनी सांगितले. एरव्ही दहा रुपयांमध्ये प्रवाशांना नेणाऱ्या रिक्षाचालकांकडून २०-२५ रुपये मागणी केली जात होती. मनिषा वाघमारे यांना कामानिमित्त हडपसरहून स्वारगेटला जायचे होते. मात्र, बससेवा बंद असल्याने त्यांनी रिक्षाचा पर्याय निवडला.

दरम्यान, रिक्षाचालकाने त्यांना दोनशे रुपये लागतील, तेही शेअर पद्धतीने आणखी दोन प्रवासी मिळाल्यानंतर जाता येईल, असे सांगितले. नीता उरसळ यांना आज हडपसरहून बाणेर येथे जायचे होते. बससेवा बंद असल्याने रिक्षाचालकांनी अडवून चारशे रुपयांची मागणी केली. त्याचवेळी स्वारगेटला जाणाऱ्या दोघी महिला प्रवाशांकडून शेअर पद्धतीने स्वारगेटपर्यंत दोनशे दोनशे रुपये घेतले. आज बस बंद असल्याचा रिक्षाचालकांनी पुरेपूर फायदा घेत प्रवाशांची आर्थिक लुबाडणूक केली, असे त्यांनी स्पष्ट केले.