पुणेकरांसाठी खुशखबर ! PMPML ची सेवा 3 सप्टेंबरपासून सुरू होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन करण्यात आले होते. लॉकडाऊन काळात पुण्यातील पीएमपीएमएल बस सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. आता अनलॉकमध्ये जनजीवन हळूहळू पूर्ववत होत आहे. लॉकडाऊनमुळे बेजार झालेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 3 सप्टेंबर पासून पीएमपीएमएल बस सेवा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज (गुरुवार) दिली आहे. तब्बल पाच महिन्यानंतर पीएमपीएमएल रस्त्यावर धावणार आहे.

दोन्ही शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सुरु करण्याचा निर्णय पीएमपीएमएल प्रशासनाने घेतला आहे. यासंदर्भात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर आज पुणे महापालिकेत बैठक बार पडली. या बैठकीला पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, पुणे पालिका आयुक्त राजेंद्र जगताप, पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप, पिंपरी चिंचवड महापौर उषा माई ढोरे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आदी उपस्थित होते.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीएमपीएमएलची बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आता राज्य शासनाच्या आदेशानुसार लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील सर्व परिस्थिती पूर्ववत येण्यास मदत झाली आहे. आता नागरिकांचा विचार करता आणि पिएमपीएमएल सुरु करण्याची मोठ्या प्रमाणात मागणी होत होती. त्यामुळे आज दोन्ही महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये 3 सप्टेंबरपासून बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तसेच प्रतिबंधीत क्षेत्र आणि मध्य भागातील पेठांचा भाग सोडून ही बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महामंडळाकडील एकूण 13 डेपोंच्या 190 मार्गावर 421 बसेसचे संचालनाचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील प्रमुख रस्ते उपनगर या ठिकाणावरील गर्दीच्या वेळी म्हणजे सकाळ आणि संध्याकाळी पीएमपीएमएलची शटल सेवा सुरु राहील. तसेच प्रत्येक बसमध्ये केवळ 50 टक्के प्रवासी असणार आहेत. बसमध्ये आसनावर मार्कींग हे पेटींगद्वारे करण्यात आले असून प्रवाशांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.