विनाकारण रस्त्यावर वाहनांवरून फिरणार्‍यांवर पोलिसांकडून कारवाई, वाहने जप्त

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – राज्यात संचारबंदी आणि शहरात वाहने रस्त्यावर अण्यास बंदी असताना देखील काही टवाळखोर अन रिकामटेकडे वाहने घेऊन फिरत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली आहे. दोन दिवसात पावणे तीनशे वाहने जप्त केली असून 470 जणांवर 188 नुसार गुन्हे दाखल केले आहेत. यापुढे आणखी ही कारवाई जोरात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्यात संचारबंदी करण्यात आली आहे. तर देश लॉकडाऊन केला आहे. अत्यावश्यक वगळता कोणालाही घरा बाहेर पडू नये, असे सांगण्यात आले आहे. मात्र तरीही काहीजण वाहने घेऊन फिरत आहेत. प्रथम पोलिसांनी अनेकांना काठीचा प्रसाद दिला. तर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली. तरीही या रिकामटेकड्यांचा बाहेर पडण्याचा छंद कमी होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसाकडून जोरदार कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 188 नुसार गुन्हे तर दाखल करण्यात येत आहेतच पण त्यांची वाहने देखील जप्त करण्यात येऊ लागली आहेत. त्यामुळे आता याला लगाम लागण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी दोन दिवसात 270 वाहने जप्त केली असून 470 जणांवर 188 नुसार गुंन्हे दाखल करण्यात आले आहेत.शहरात दोन दिवसात (30 व 31 मार्च) वाहतूक विभागाने वेगवेगळ्या विभागात 158 जणांवर 188 नुसार खटले भरले आहेत. तर स्थानिक पोलिसांनी देखील 317 जणांवर कारवाई केली आहे. दोन दिवसात 270 वाहने जप्त केली आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.