Pune News : गुटखा विक्रीतुन मिळालेल्या मोठ्या रक्कमेतून ‘हवाला’त देवाण-घेवाण, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, मोठी रक्कम जप्त, अनेकांचे धाबे दणाणले

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – फरासखाना व विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या पथकाने बेकायदेशीर गुटखा विक्रीतुन मिळालेल्या मोठ्या रक्कमेतून हवालात देवाण-घेवाण होणाऱ्या व्यवहाराचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. यात 8 ते 9 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. दरम्यान या कारवाईत गुन्हे शाखेने मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली असल्याचे सांगण्यात आले आहे.

तंबाखूजन्य पदार्थ तसेच गुटखा विक्रीवर राज्यात बंदी आहे. पण इतर राज्यातून आलेल्या गुटख्याची शहरात तेजीत विक्री सुरू आहे. गुटखा विक्रीत मिळालेली रोकड हवाला व्यवहाराच्या माध्यमातून पोहचविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी रात्री पोलिसांनी कारवाई केली. या इमारतीत असलेल्या कार्यालयातून हवाला व्यवहाराच्या माध्यमातून गुटखा विक्रीतील रोकड संबंधितांना पोहचविण्यात येत असल्याची माहिती चौकशीत मिळाली.

पोलिसांनी हवाला व्यवहार करणाऱ्या चार कार्यालयांवर कारवाई केली असून नोव्हेंबरमध्ये लोणीकाळभोर परिसरात बेकायदा गुटखा विक्री प्रकरणात एकाला पकडण्यात आले होते. त्याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत बेकायदा गुटखा विक्रीतून मिळालेली रोकड हवाला व्यवहारातून संबंधितांपर्यंत पोहचविण्यात येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.