Pune : हडपसरमधील मोअर आणि रिलायन्स मॉलवर पोलिसांची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य शासनाने विकएंडला शनिवार रविवारी लॉकडाऊन जाहीर केले असूनही हडपसरमधील (ससाणेनगर, वर्धमान टाऊनशीप) मोअर फॉर यू आणि रिलायन्स फ्रेश मॉल सकाळी सात वाजता उघडले होते. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. मात्र, किराणा दुकान आणि इतरही दुकानदारंनी कडकडीत बंद पाळला होता. दरम्यान, हडपसर पोलीस स्टेशनला तक्रार केल्यानंतर पोलिसांनी मॉल बंद करून व्यवस्थापकाला पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशनला नेल्याचे विशेष पोलीस अधिकारी दीपक गायकवाड यांनी सांगितले.

गायकवाड म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कडक निर्बंध जाहीर केले आहेत. राज्य शासनाने मॉल आणि दुकानदारांसाठी एकच अध्यादेश काढला आहे. तरीसुद्धा डी मार्टमध्ये कपडे, भांडी इतरही सर्वच वस्तू विक्रीसाठी खुले असते. त्यामुळे इतर व्यावसायिकांनी तक्रार केली आहे. मॉलमध्ये प्रचंड गर्दी असते, तेथे कोरोना पसरत नाही का, आमच्या दुकानात चार-दोन ग्राहक येतात, त्यामुळे कोरोना पसरतो का, असा संतप्त सवाल किरकोळ दुकानदारांनी उपस्थित केला आहे. हडपसरमधील ससाणेनगर येथील मोअर फॉर यू आणि रिलायन्स फ्रेश मॉल सुरू होते. त्यामुळे किरकोळ दुकानदारांनी संताप व्यक्त केला. दुध आणि औषधे सोडून सर्व बंदचे आदेश असताना हे लोक मॉल कसे सुरू ठेवतात, असा संतप्त सवाल दुकानदारांनी उपस्थित केला.

हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणाले की, सासणेनगरमधील मॉल सुरू केल्याची माहिती मिळताच तातडीने पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कारवाई केली. दरम्यान, दूध विक्रीसाठी सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत परवानगी आहे. मात्र इतर वस्तू विक्रीसाठी परवानगी नाही. अकरा वाजता सर्व दुकाने आणि मॉल्स बंद केले जातील. कोणी सुरू ठेवले, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.