Pune News : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मोठी कारवाई ! 8 पिस्तुले, 48 कोयते, 14 तलवारी, 5 पालघन, 5 सत्तुर अन् 9 काडतुसे जप्त; 443 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांकडून नववर्षाच्या पुर्व संध्येला मास्टर प्लॅननुसार कारवाई करण्यात आली. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी संपूर्ण शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहरात बुधवारी (दि.30) रात्री साडेतीन तास कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. यामध्ये 2893 गुन्हेगारांना चेक करण्यात आले. त्यापैकी 756 गुन्हेगार सापडले आहेत. त्यानुसार 443 जणांना अटक करण्यात आली आहे. कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 16 लाख 62 हजार 812 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शहरामध्ये पोलिसांनी ठिकठिकाणी शोध मोहिम राबवून कारवाई केली. यामध्ये आर्म अॅक्टनुसार 8 आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून 7 पिस्तुल आणि 9 काडतुसे जप्त केली. तसेच 66 आरोपींना अटक करून 48 कोयते,14 तलवारी, कुकरी, 5 पालघन, चाकू, 2 सत्तूर जप्त करण्यात आला. याशिवाय तडीपार आदेशाचा भंग करुन शहरात वास्तव्यास असलेल्या 16 जणांना अटक करण्यात आली.

pune-police

संशयास्पदरित्या फिरणाऱ्या 28 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. एनडीपीएस अ‍ॅक्टप्रमाणे एकाला अटक करुन 7 लाख 65 हजारांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. पोलिसांनी 3 लाख 20 हजार रुपयांची 8 वाहने जप्त केली आहे. तसेच पाहिजे असलेल्या रेकॉर्डवरील एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. याशिवाय 2 लाख 51 हजार 762 रुपयाचा गुटखा, 18 हजार रुपयाचा 910 ग्रॅम गांजा जप्त करुन एकाला अटक केली. पीटा केसमधील दोन आरोपांना अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मराळे तसेच परिमंडळ पोलीस उपायुक्त व पोलीस उपायुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखेचे युनटचे पोलिस निरीक्षक व त्यांच्या पथकाने केली.

कोम्बिंग ऑपरेशन कारवाई

– तपासण्यात आलेले एकूण गुन्हेगार – 2893, प्रतिबंधक कारवाई – 414, अटक गुन्हेगार – 443, सीआरपीसी नोटीस – 176

जप्त केलेला शस्त्रसाठा

पिस्तूले -8, काडतुसे – 9, कोयते -48, तलवार -14, पालघन – 5, सत्तूर – 5