Pune : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी 5 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलीस, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांच्या पथकाने टाकलेल्या धाडीनंतर 5 जणांना अटक करण्यात आली आहे. प्रशासक म्हणून नेमलेल्या जितेंद्र कंडारे याच्या चालकाला आज पोलिसांनी अटक करत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कमलाकर भिकारी कोळी (वय 28, रा. जळगाव) याला अटक केली आहे. तर यापूर्वी सुजित सुभाष बाविस्कर उर्फ वाणी (वय 42), धरम किशोर साखला (वय 40), महावीर मानकचंद जैन (वय 37) व विवेक देविदास ठाकरे (वय 45, सर्व रा. जळगाव) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने 6 डिसेंम्बर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत निवृत्त शिक्षिकेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2015 मध्ये बीएचआर पतसंस्थेवर प्रशासक नेमण्यात आले होते. तर 2016 मध्ये अवसायक म्हणून जितेंद्र कंडारे यांची नेमणूक केली होती. यात त्यांनी गैरव्यवहार उघड होऊ नये, म्हणूम जाणीवपूर्वक लेखा परीक्षण केले नाही. तसेच प्रशासक व इतरांनी जाणीवपूर्वक व संगनमताने एकत्रित पतसंस्थेच्या मालमत्ता बनावट वेबसाईट तयार करून गुप्त कटात सहभाग सुनील झंवर याला घेऊन त्याच्या फर्मवर वर्ग केल्या. तसेच पूर्ण मोबदला न देता ठेवीदारांच्या पावत्या 30 टक्केने विकत घेऊन त्या 70 टक्के रकमेचा व संस्थेच्या मालमतेचा अपहार केला. या मालमत्ता अत्यंत कमी दरात बेकायदेशीर रित्या वर्ग केल्याचे दाखविले. तर ठेवीदारांना पूर्ण रक्कम दिल्याचे खोट्या नोंदी रेकॉर्डला सुजित वाणी इतरांच्या सांगण्यावरून केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. अवसायकाने फिर्यादी याना व त्यांच्या बहिणीने गुंतवलेली रक्कम अदा न करता फसवणूक केली आहे.