Pune News : बोपदेव घाटात दरोडा टाकणाऱ्या ५ जणांना अटक, कोंढवा पोलिसांची कामगिरी 

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – दुकान बंद करुन घरी येणाऱ्या दुकानदाराला बोपदेव घाटात अडवून लुबाडणाऱ्या ५ जणांना कोंढवा पोलिसांनी अटक केली.

चेतन संजय वैराट (वय २२), सुरज विठ्ठल गायकवाड (वय १९, दोघे रा. हिवरे, ता. पुरंदर), रोहीत सुरेश बाबर (वय २१), राजेश सिताराम निघोले (वय २२, दोघे रा. सासवड) आणि जगन्नाथ दत्तात्रय वाघमारे (वय २०, रा. सासवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

विकास रोहीदास दरेकर (वय ३५, रा. कोंढवा बुद्रुक) हे त्यांचे हिवरे गाव येथील शेतीचे खत व औषधाचे दुकान बंद करुन २९ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता घरी येत होते. बोपदेव घाट उतरुन येवलेवाडी येथे आले असताना तीन मोटारसायकलवरुन आलेल्या ८ जणांनी त्यांना अडवले. कोयता, लोंखडी रॉडने मारहाण करुन त्यांच्याकडील बॅगेतील १ लाख ३० हजार रुपये रोख व मोबाईल, चेकबुक, एटीएम कार्ड व इतर कागदपत्रे असा १ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला होता.

या गुन्ह्यांचा तपास करत असतान अंमलदार ज्योतीबा पवार, अमित साळुंखे यांना चेतन वैराट व सुरज गायकवाड हे पिपंरीतील महात्मा फुलेनगर येथे मित्राच्या घरी लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यावरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांच्या सूचनेवरुन सहायक निरीक्षक चेतन मोरे, उपनिरीक्षक प्रभाकर कापूरे व तपास पथकातील अंमलदार यांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या तपासातून इतर आरोपींची नावे निष्पन्न झाली. रोहीत बाबर, राजेश निघोले यांना बारामतीवरुन तसेच सासवड येथून जगन्नाथ वाघमारे याला ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्यात वापरलेल्या २ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी पोलिसनामाला सांगितले की दरोड्याचा गुन्हा रात्रीची वेळ व घटनास्थळी कोणताही परिस्थितीजन्य पुरावा नसताना केवळ २ दिवसात कोंढवा पोलिसांनी या दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

रोहीत बाबर व राजेश निघोले हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे करीत आहेत.