मुंबईवरून पुण्यात दरोडा टाकण्यासाठी आलेल्या 6 जणांच्या टोळीला अटक

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईवरून पुण्यात दरोडा टाकण्यासाठी आलेल्या सहा जणांच्या टोळीला शस्त्रसाठ्यासह स्वारगेट पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. ते स्वारगेट परिसरातील एका एटीएम केंद्रावर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते.

किरण सुभाष मिस्त्री (वय 24), सुर्यकांत सानप्पा गंगेरू (वय 25), इशरद बेग अब्दुल रहीम (वय 28), नजीद मुजीद मोमीन (वय 20), मोहमंद शब्बीर शेख दस्तगीर (23) आणि रहीमतउल्ला समीरउल्ला शेख (वय 26, रा. सर्व. मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील वाढत्या घरफोड्या, वाहन चोरी आणि लुटमारीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी स्थानिक पोलिसांकडून हद्दीत गस्त घातली जात आहे. तर, सराईतांवर लक्ष केंद्रीत केले जात आहे.
दरम्यान, स्वारगेट पोलीस परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना या सहा जणांबाबत माहिती मिळाली होती. सहा जण सातारा रस्त्यावरील कॉनॉलच्या परिसरात असणार्‍या एटीएम केंद्रावर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी स्वारगेट पोलीसांनी त्यांना पकडले. त्यांच्या ताब्यातून एक एअरगण, गोल्फ स्टीक, लोखंडी सुरा, अशी घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत असून, त्यांनी यापुर्वी कुठे गुन्हे केले आहेत का, याबाबत माहिती घेतली जात आहे.